दि.०३(पीसीबी)-मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता टेक्नॉलॉजी क्षेत्रावरही दिसू लागला आहे.इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने दुबईमधील अमेरिकन टेक कंपनी Oracle च्या डेटा सेंटरवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.मात्र, या हल्ल्याची UAE सरकारकडून अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.दरम्यान, Oracle कंपनी आधीच मोठ्या प्रमाणातील कर्मचारी कपातीमुळे चर्चेत होती.भारतामध्ये सुमारे 12 हजार, तर जागतिक स्तरावर 30 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले असल्याची माहिती आहे.
इराण Oracle ला टार्गेट का करत आहे?
माहितीनुसार, Oracle चे अमेरिकेच्या संरक्षण विभागासोबत करार आहेत.तसेच कंपनीचे संस्थापक लॅरी एलिसन यांचे इस्रायल सरकारशी संबंध असल्याचे सांगितले जाते. यामुळेच Oracle वर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान, इराणने अमेरिकन टेक कंपन्यांना थेट इशारा दिला आहे.
यामध्ये Intel, Amazon, Meta, Microsoft, Apple, Google आणि IBM या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
इराणने स्पष्ट केले आहे की,जर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले थांबवले नाहीत, तर या कंपन्यांच्या ऑफिस आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले होऊ शकतात.इतकंच नाही, तर या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी ऑफिस रिकामे करण्याचाही इशारा दिल्याचे वृत्त आहे. एकूणच, हा संघर्ष आता सायबर आणि टेक वॉरकडे वळत असल्याचे संकेत मिळत आहेत.






































