मधुकर पवळे क्रीडांगण बनले गुंड व नशा करणाऱ्या लोकांचा अड्डा

0
39

पिंपरी, दि. 06 (पीसीबी) : निगडी येथील कै. मधुकर पवळे क्रीडांगण हे गुंड व नशा करणाऱ्या लोकांचा अड्डा बनले आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. हे क्रीडांगण तातडीने क्रीडा विभागाच्या ताब्यात घेण्यात यावे अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. या समस्येकडे गांभीर्याने दखल न घेतल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही चिखले यांनी यावेळी दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना या संदर्भात सचिन चिखले यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभाग क्र.१३ निगडी यमुनानगर परिसरामध्ये कै. मधुकर पवळे क्रीडांगण हे आहे. त्याच्या बाजूला स्पर्धा परीक्षा केंद्र देखील आहे. या केंद्रामध्ये सुमारे ४०० ते ५०० विद्यार्थी अभ्यासासाठी रोज ये-जा करत असतात. त्याच प्रमाणे क्रीडांगणावर सकाळ संध्याकाळ प्रभागातील नागरिकांचा तसेच खेळाडूंचा मोठा वावर असतो.

अनेक वर्षापासून कै. मधुकर पवळे क्रीडांगण हे क्रीडा विभागाकडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी करत आहोत. अनेक वेळा पत्र व्यवहार देखील केलेला आहे. हे क्रीडांगण सध्या कुणाच्याही ताब्यात नसल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भटकी जनावरे मुक्त संचार करत असतात. त्याचप्रमाणे गुंड, नशा करणारी माणसे मुले यांचा अड्डा हे क्रीडांगण झाले आहे. वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून सुद्धा यावर कारवाई होत नाही. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची व खेळाडूंची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

या क्रीडांगणाला कोणताही टाईम टेबल नसल्यामुळे रात्रभर या ठिकाणी गावगुंड व तरुण-तरुणींचा धिंगाणा सुरू असतो. अनेक वेळा येताना जाताना ज्येष्ठ नागरिकांच्या समोर लज्जास्पद कृत्य चालू असते. त्याचप्रमाणे मागील काही दिवसांपूर्वी याच क्रीडांगणामध्ये किरकोळ भांडणे, खून करण्याचा प्रयत्न असे प्रकार सातत्याने होत आहेत. हे सर्व वेळोवेळी आम्ही प्रशासनाला व पोलिसांना सांगितले आहे, तरी देखील याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. भविष्यात या ठिकाणी एखादी‌ मोठी घटना घडून शहराचे नाव खराब होणार नाही याकरिता आपण लवकरात लवकर हे क्रीडांगण क्रीडा विभागाच्या ताब्यात देऊन या ठिकाणी एक व्यवस्थित टाइम टेबल आखावा. सुरक्षारक्षक देऊन नागरिकांना चांगली सोय करून देण्यात यावी. सीमा भिंतीची सुद्धा दुरुस्ती करून देण्यात यावी. तातडीने प्रशासनाने याची दखल न घेतल्यास पुढील दोन ते तीन दिवसांमध्येच क्रीडा विभागामध्ये येऊन मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.