मताला तब्बल ५,००० चा भाव फुटला, चिंचवडमध्ये पैशाचा महापूर

0
387

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – राज्यात सर्वात प्रतिष्ठेची ठरलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सहानुभूतीचा नाही, तर पैशाच प्रचंड मोठा महापूर आला आहे. दोन दिवसांपूर्वी मताला १,००० रुपये प्रमाणे पैसा वाटले गेले आणि आता जिथे विरोधी मतदान होते तिथे एका मताला सुरवातीला २,००० रुपये होते आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तोच दर तब्बल ५,००० रुपयेवर पोहचल्याचे कार्यकर्तेच सांगतात. बलाढ्या उमेदवारांनी किमान एक लाख मते दलालांमार्फत विकत घेण्याचे नियोजन केले असून तीन दिवसांपासून ही यंत्रणा अत्यंत गुप्त पध्दतीने काम करत असल्याचे सांगण्यात आले. एका किरकोळ पोटनिवडणुकित पैशाचा इतका भरमसाठ वापर होत असल्याने मतदार हरखून गेला असून मतांचा निव्वळ बाजार भरल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या हातातून पिंपरी चिंचवडची एकहाती सत्ता भाजपने २०१७ मध्ये अक्षरशः हिसकावून घेतली. किमान यावेळी पुन्हा ती सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी सर्व ताकदिने उतरली आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अचानक चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक लागल्याने ही रंगीत तालिम समजून अजित पवार यांनी ताकद पणाला लावली. जर का ही पोटनिवडणूक हारलोच तर पुन्हा येणाऱ्या महापालिकेत राष्ट्रवादी भाजपला तोंड काढू देणार नाही, अशी भिती भाजपला असल्याने देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षासह राज्य सरकारची पूर्ण ताकद अश्विनी जगताप यांच्या मागे उभी केली. गडगंज संपत्तीचे विरण देणारे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनीही जिद्दीने भाजप आणि राष्ट्रवादीच्या विरोधात ताकद निर्माण केली. या चढोओढीत पाणी, रस्ता, अनधिकृत बांधकामे, शास्तीकर या मुद्यांचा प्रचार झाला. भाजपने दिवंगत आमदार जगताप यांच्या पत्नी म्हणून सहानुभूतीचा मुद्दा लावून धरला. प्रत्यक्षात हे सगळे मुद्दे बाजुला पडले आणि मतदान खरेदी करण्याची चढाओढ लागली आहे. पोटनिवडणूक जिंकली तरच आगामी महापालिकेत आपली सत्ता येणार याचे समिकरण तयार झाल्याने पवार आणि फडणवीस समर्थकांनी अखेरच्या क्षणी मॅन, मनी, मसलचा वापर सुरू केला आहे.

मध्यमवर्गीय, गोगरिब मतदारांना खरेदी कऱण्याची स्पर्धा लागली असून कोणीही उमेदवार त्यात मागे नाही. बुधवार पासून १,००० रुपये प्रमाणे काळेवाडी, थेरगावात मते खरेदीचा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. पुढे त्याचा विस्तार होत गेला आणि मताचा भावसुध्दा वाढला. वेताळनगर, म्हातोबावस्ती, विजयनगर, दळवीनगर, काळा खडक, दळवीनगर, नागसेननगर या झोप़डपट्टी भागात अगदी सुरवातीला एक हजार रुपये प्रमाणे मतासाठी पैसे दिले गेले. दलाल कार्यकर्ते एका घरात किती मतदान आहे ते पाहून ओळखपत्र घेतात आणि रोख पैसे देतात, अशी अफवा पसरली. पाहता पाहत घरघरात ही चर्चा गेली आणि लोक पैशासाठी वाट पाहू लागले. गुरुवारी हाच दर २,००० आणि आता तो थेट ५,००० रुपये प्रमाणे सुरू असल्याचे फेरफटक्यात काही मतदारांनीच सांगितले.
शहरात पन्नास वर्षांत महापालिका, विधानसभा, लोकसभेच्या अनेक निवडणुका पार पडल्या. इतक्या मोठ्या

प्रमाणात मतांची खरेदी-विक्री कधी दिसली नाही. काही उच्चभ्रू मतदारसुध्दा आपल्या सोसायटीची यादी देत किमान ३,००० रुपये प्रमाणे घाऊकमध्ये मतांची विक्री करत असल्याचा लाजिरवाणा प्रकार कानावर आला. पाणी प्रश्नावर विरोधात बोलणारे काही कार्यकर्तेसुध्दा यात मागे नसल्याचे सांगण्यात आले. सुरवातीला १,००० रुपये प्रमाणे ज्यांची मते विकत घेतली त्यांना आपल्या शेजारी २,००० रुपये प्रमाणे पैसे दिल्याचे समजल्यावर पैसे वाढवून देण्याची मागणीसुध्दा होऊ लागली आहे. बिजलीनगरला मताला ५,००० रुपये दिले, पण वेताळनगर झोपडपट्टीत फक्त १,००० रुपये दिल्याचे समजल्याने तिथे असंतोषाची ठिणगी उडाल्याचे पहायला मिळाले.