मतपत्रिकेवर मतदान झाल्यावर भ्रष्टाचार होणार नाही का?

0
49

– सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली

मुंबई, दि. 26 (पीसीबी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा मुद्दा गाजत आहे. या निवडणुकीत महायुतीला दणदणीत बहुमत मिळाले. त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमधध्ये गोंधळ झाल्याचा आरोप सुरु केला. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी पराभूत झालेल्या राजकीय पक्षांनी सुरु केली. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी करत याचिका दाखल झाली. डॉ. के.ए. पॉल यांनी ही याचिका दाखल केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारला. पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असे कसे होऊ शकते? त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

सर्वोच्च न्यायालयाने विचारले…

डॉ. के.ए पॉल यांनी केवळ मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी केली नाही तर निवडणुकी दरम्यान पैसे आणि दारु वाटणाऱ्या उमेदवारांना पाच वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी आणण्याची मागणी केली. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी.बी. वराले यांच्या खंडपीठासमोर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका सुनावणीस आली. त्यावर खंडपीठाने म्हटले, पराभव झाल्यावरच ईव्हीएममध्ये बिघाड का असतो, विजय झाला तेव्हा हा आरोप का होत नाही, असा प्रश्न करत मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी फेटाळली. परंतु मतदारांना प्रलोभन दाखवताना पैसे दारू किंवा अन्य वस्तूंचे वाटप केल्यास उमेदवाराला पाच वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी आणली.
तुम्हाला ही कल्पना कशी आली?

सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यास विचारले, तुम्हाला ही चांगली कल्पना आली कुठून? त्यावर पॉल म्हणाले, मी १५० देशांचा प्रवास केला आहे. त्यावर न्यायालयाने विचारले, त्या ठिकाणी ईव्हीएमवर मतदान होते की मतपत्रिकेवर? त्यावर पॉल म्हणाले, अनेक देशांमध्ये मतपत्रिकेवर मतदान होते. त्यामुळे भारतातही मतपत्रिकेवर मतदान व्हावे.

पॉल यांनी आपल्या मागणीचे समर्थन करताना सांगितले, यावर्षी जूनमध्ये निवडणूक आयोगाने ९ हजार कोटी रुपये जप्त केले होते. भ्रष्टाचार होत असल्याने मतपत्रिकेवर मतदान व्हावे. त्यावर कोर्टाने विचारले, मतपत्रिकेवर मतदान झाल्यावर भ्रष्टाचार होणार नाही का? त्यावर पॉल म्हणाले, टेसलाचे सीईओ एलन मस्क यांनीही ईव्हीएममध्ये फेरफार होऊ शकतो? असे म्हटले सांगितले. जगन मोहन रेड्डी, चंद्रबाबू नायडू यांनी ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचे म्हटले होते. त्यावर खंडपीठाने म्हटले, जेव्हा चंद्रबाबू नायडू निवडणुकीत पराभूत झाले तेव्हा त्यांनी ईव्हीएममध्ये गडबड असल्याचे म्हटले. जेव्हा रेड्डी पराभूत झाले तेव्हा त्यांनीही तेच म्हटले. परंतु विजयी झाले तेव्हा ईव्हीएम चांगले होते.