मतदार यादी हरकतींवरील कार्यवाहीसाठी मुदतवाढ द्या; भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

0
173

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या मतदार याद्यांवर शहरातील सर्वपक्षीय इच्छुकांनी आक्षेप व हरकती घेतल्या आहेत. मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्यामुळे त्यावरील कार्यवाहीसाठी प्रशासनाला मुदतवाढ देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ नियोजन करावे, अशी मागणी भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली  आहे.

याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यु. पी. एस. मदान यांना निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मनपा सार्वत्रिक निवडणूक-2022 च्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. सदर याद्या प्रसिद्ध करत असताना प्रभागाच्या सीमांबाबत कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही. बऱ्याच  प्रभागातील याद्यांमध्ये इतर प्रभागातील नावे समाविष्ठ झालेली निदर्शनास आले आहे. यावर पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांकडून सुमारे 8 हजाराहून अधिक हरकती नोंदविल्या गेल्या आहेत.

सदर हरकतींवर योग्य प्रकारे निर्णय करून त्या निकाली काढाव्यात. हरकतींची संख्या पहाता यावरील सुनावणी पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे हरकतींवरील सुनावणीची कामे योग्य प्रकारे पूर्ण होणार नाहीत. त्यासाठी हरकतींवरील कारवाई करण्याची  मुदत कमीत-कमी 15 दिवस वाढवून मिळावी, अशी आमची मागणी आहे.