थेरगाव, दि. १७ – चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज १७ नोव्हेंबर रोजी सुमारे २५ हजार ६६४ मतदार मार्गदर्शिका आणि १७ हजार ९०६ मतदार माहिती चिट्ठ्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत मतदारसंघात एकूण १ लाख ४७ हजार १९७ मतदार मार्गदर्शिका आणि ५ लाख ७५ हजार ८६४ मतदार माहिती चिट्ठ्यांचे वाटप मतदारांना करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ५६१ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांच्या घरी जाऊन मतदार माहिती चिट्ठ्यांचे आणि मतदार मार्गदर्शिकेचे वाटप करण्यात येत असून याद्वारे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि नवमतदारांना मतदार माहिती चिट्ठी आणि मतदार मार्गदर्शिका वाटप करण्यावर भर दिला जात आहे.
भारतीय निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळालेल्या निर्देशानुसार ज्या ठिकाणच्या मतदान केंद्रांची जागा बदलली आहे त्या ठिकाणच्या मतदारांना यापूर्वी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत त्याची लेखी स्वरूपात माहिती देण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत १०० टक्के मतदार माहिती चिट्ठी आणि मतदार मार्गदर्शिका वाटण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त जुन्या व नव्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी माहिती दर्शक फलकही लावण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे.
205 चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या ब्रँड अॅम्बेसेडर, ख्यातनाम आंतरराष्ट्रीय रायफल शुटर अंजली मंदार भागवत यांना मतदान करण्यासाठी मतदार चिट्ठी वितरण करण्यात आली. यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोष सुर्वे, अंजली भागवत, समन्वयक रवींद्र कांबळे, समन्वयक राजेंद्र सोनावणे यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार केला.