मतदारांनी चक्क अजित पवार यांचा ताफा अडवून त्यांना विचारला जाब

0
208

अहमदनगर, दि. १५ (पीसीबी): राजकीय समीकरणे कधी कशी बदलतात याचा काही नेम नसतो, त्यामुळे मतदारही नेहमी पेचात पडतात. पण आज मतदारांनी चक्क अजित पवार यांचा ताफा अडवून त्यांना जाब विचारला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांचे धोतर फेडण्याची भाषा अजित पवारांनी केली, त्याच नेत्याच्या प्रचारासाठी पवार आज नगरमध्ये आले.

मात्र, यावेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पवारांचाच ताफा अडवला व या बदलेल्या भूमिकेचा जाब विचारला.2019च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मधुकर पिचड यांच्या अत्यंत जवळचे समजले जाणाऱ्या सीताराम गायकर यांच्यावर टीका करत अजित पवार म्हणाले होते, “निवडणुकीत गायकर यांना धोतर फेडायला लावेल.” आता हेच गायकर अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी अजित पवार अकोले येथे आले आहेत.

यावेळी तिथल्या शेतकऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसला. शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला. ” आम्ही डॉ. किरम लहामटे यांना निवडून दिले आहे. तुम्ही गायकरांचा प्रचार कसा काय करू शकतात. 2019मध्ये ज्यांचे तुम्ही धोतर फेडणार होता, त्यांचा आज प्रचार कसा काय करता,” असा सवाल शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी केला आहे.दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना हटकले. दशरथ सावंतांसह काही आंदोलकांना ताब्यातही घेतले. त्यामुळे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.