मतदारांना मतदानासाठी ओळखपत्र अनिवार्य; १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध

0
167

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी येणाऱ्या मतदारांकडे ओळख मतदान चिट्टी ( फोटो वोटर स्लीप) असणे अनिविवार्य आहे. मतदाराकडे भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या पुराव्यांपैकी किमान एका पुराव्याची मूळ प्रत असणे आवश्यक आहे. डिजिटल लॉकर मधील सॉफ्ट कॉपी ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध असून कोणीही मतदान केंद्राच्या १०० मीटर क्षेत्रात सोबत मोबाईल आणू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर नियमाधीन कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मावळ लोकसभा मतदार संघासाठी येत्या सोमवारी दि.१३ मे रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुषंगाने आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस उप अधीक्षक सत्य साई कार्तिक, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिंमत कराडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, निवडणूक समन्वयक अभिजित जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन मस्के, माध्यम समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

मतदारांनी मतदान करण्यासाठी येताना ओळख मतदान चिट्टी सोबत भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ ओळख पत्रांपैकी कोणत्याही एका ओळखपत्राची मूळ प्रत सोबत ठेवणे अनिवार्य असून मतदारांना केवळ ओळख मतदान चिट्टीद्वारे मतदान करता येणार नाही. तसेच डिजिटल लॉकर मधील सॉफ्ट कॉपी अथवा ओळखीच्या पुराव्याची छायांकित प्रत मतदानासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नसल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तसेच भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणालाही मतदार केंद्रावर मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.