मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून मारहाण

0
234

चिंचवड , दि २६ (पीसीबी) मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरून पाच जणांनी मिळून तिघांना बेदम मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी दोन महिला गेल्या असता महिलांना शिवीगाळ, मारहाण करून त्यांचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 25) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास रहाटणी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

ऋतिक गोविंद काटे (वय 23, रा. पिंपळे सौदागर), राकेश दिलीप काळे (वय 33, रा. हडपसर), हर्षल शंकर काटे (वय 29, रा. पिंपळे सौदागर), भानुदास गणेश काटे (वय 25, रा. पिंपळे सौदागर), विशाल चंद्रकांत जगताप (वय 33, रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी कारमधून फिर्यादी यांच्या घरासमोर आले. फिर्यादी यांचे पती आणि दोन मुले मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरून कारमधून आलेल्या पाच जणांनी तिघांना बेदम मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी आणि त्यांच्या सवत मध्ये गेल्या. त्यावेळी संशयित आरोपींनी दोघींना मारहाण करत शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.