मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वसमावेशक आरखडा

0
2

पिंपरी, दि. 23 (पीसीबी) : पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वसमावेशक आरखडा तयार करण्यात आला असून शहरी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रभावीपणे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या वतीने मतदान जनजागृती करण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी माहिती दिली. यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, तानाजी नरळे, मुकेश कोळप, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, ग्यानचंद भाट, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, मुख्य आरोग्य निरीक्षक एस. गायकवाड, समाज सेवक विशाल शेंडगे, मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, किसन केंगले, पी.बिबवे, उपलेखापाल अनिल कुऱ्हाडे,लिपिक अभिजीत डोळस, प्रिन्स राणाप्रताप सिंह यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील सरासरी मतदानाचे प्रमाण हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सरासरी मतदानाच्या प्रमाणापेक्षा कमी असून, याबाबत भारत निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात येणाऱ्या पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात सरासरी मतदानाचे प्रमाण कमी असल्याचे गत सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत आढळून आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेमार्फत पिंपरी चिंचवड महापालिकेला आपल्या क्षेत्रामध्ये मतदार जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कार्यक्रम घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुषंगाने महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या नेतृत्वात मतदार जनजागृती करण्यासाठी स्वीप कक्ष स्थापित करण्यात आले आहे.

अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, महापालिकेच्या वतीने शहरातील मतदानाचे सरासरी प्रमाण वाढविण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार तिन्ही मतदार संघात जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यासाठी शहरातील महत्वाचे चौक, उद्याने,क्रीडांगणे, महाविद्यालये,सोसायट्या, मॉल, सिनेमागृह, जिम, व्यावसायिक आस्थापना, कंपन्या, महिला बचत गट, झोपडपट्टी परिसर, ज्येष्ठ नागरिक संघ, भाजी मंडई, मजूर अड्डा,रुग्णालये व औद्यगिक अस्थापना आदी ठिकाणी स्वीप कक्षाच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये “नो युवर वोटींग सेंटर” हेल्पलाईन देखील सुरू करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय कुमार खोराटे यांनी सांगितले.


दिवाळी सणाच्या निमित्ताने शहरात दिवाळी पहाट तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अशा सांस्कृतिक कार्यक्रमात नागरिकांची उपस्थिती अधिक असते, अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्व मतदारांना मताचा हक्क बजावण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेची अधिकृत समाजमाध्यमे, रेडिओ, रिक्षा, होर्डिंग्ज,महापालिकेचे व्हिएमडी अशा विविध माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.