मतदारसंघातून बाहेर गेलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट बनवा, मतदारांना आणण्यासाठी फोन पे करा – संतोष बांगर यांचे खळबळजनक विधान

0
63

हिंगोली, दि. 18 (पीसीबी) : राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे. त्याआधी मात्र राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचा हिंगोलीत आयोजित कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार बांगर यांनी मतदारसंघातील बाहेर जिल्ह्यात गेलेल्या मतदारांना परत येण्यासाठी फोन पे करा, असे खळबळजनक वक्तव्य केल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे.

हिंगोली च्या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी येथे तोष्णीवाल मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. परंतु आचारसंहिता लागून असताना त्यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्याने ते चर्चेत आले आहेत. ते म्हणाले, माझा उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्तीप्रदर्शन करावे, यासाठी मिळेल तेवढ्या गाड्या आणाव्यात. यासाठी बाहेर मतदारसंघातून बाहेर गेलेल्या कार्यकर्त्यांचीही लिस्ट बनवावी, कार्यकर्त्यांना लागणाऱ्या ज्या गाड्या असतील त्या गाड्यांसाठी जे पैसे लागतील ते फोन पे करा, त्यांना सांग येण्याजाण्याची काळजी असेल तर त्याचीही व्यवस्था आम्ही करू.

महायुतीचे अंतिम जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. तसेच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होणेही बाकी आहे. असे असताना आमदार संतोष बांगर यांनी स्वत:ची उमेदवारीच जाहीर करत अर्ज दाखल करण्याची तारीखही सांगितली. तसेच कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने येण्याचे आवाहनही केले आहे. आपण येत्या २४ तारखेला दुपारी १२ वाजता शिवसेना पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासोबतच कार्यकर्त्यांना प्रलोभन देण्याची भाषा केल्याने आमदार संतोष बांगर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मतदारांना एकप्रकारे आमिष दाखवण्याचा हा प्रकार असल्याने ते टीकेचे धनी ठरणार हे निश्चित आहे. विधानसभेच्या तोंडावर बांगरांनी हे वक्तव्य केल्याने निवडणूक आयोग आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे