मतदान सुरू असतानाच सुप्रिया सुळे थेट अजितदादांच्या घरी, कार्यकर्त्यांत चलबीचल

0
106

बारामतीमधील पवार विरुद्ध पवार संघर्षाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं असताना मतदारसंघात लक्षवेधी घडामोडी सुरु आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढत असलेल्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी पोहोचल्या आहेत. मतदान सुरु असताना सुळे या अजित पवारांच्या घरी पोहोचल्यानं चर्चांना उधाण आहे. सुळे अजित पवारांच्या घरी पोहोचल्या, त्यावेळी अजित पवार आणि त्यांच्या मातोश्री घरी असल्याचं समजतं. तर अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार घरी नव्हत्या. त्या मतदारसंघात असल्याचं कळतं.

शरद पवारांसोबत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्या. त्यांनी अजित पवारांचं काटेवाडीतलं घर गाठलं. त्यावेळी घरात अजित पवार आणि त्यांच्या मातोश्री उपस्थित होत्या. सुनेत्रा पवार मतदारसंघात होत्या. सुळे आणि पवार यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. पण मतदान सुरु असताना त्यांची झालेली भेट मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात संभ्रम निर्माण करणारी आहे.

राजकीय वाटा वेगळ्या झालेल्या असल्या तरी कुटुंब म्हणून आम्ही एकच आहोत, असं पवार परिवारातील सदस्यांना सांगितलं जात होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या प्रचारानंतर, त्यात झालेल्या टिकेनंतर दोन्ही बाजूंनी कटुता दूर करण्याचे प्रयत्न होतील अशी शक्यता बोलून दाखवली जात होती. पण मतदान सुरु असताना अशा प्रकारची भेट होईल याची कल्पना कोणीही केलेली नव्हती. त्यामुळे ही भेट आश्चर्यजनक मानली जात आहे.

भेटीचा फायदा कोणाला?
निवडणूक प्रचारात सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकमेकांवर जोरदार शरसंधान साधलं. विषय माहेरची साडी आणि बायकोच्या पर्सपर्यंत गेला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर इतकी टीका केल्यानंतर त्यांच्यात मतदानाच्या दिवशी भेट होईल याचा विचार मतदारांदेखील केलेला नव्हता. या भेटीमुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी गोंधळले आहेत. विधानसभेला दादा आणि लोकसभेला ताई असा पॅटर्न बारामतीच्या मतदारांनी कायम राखला आहे. आता सुळेंनी अजित पवारांचं घर गाठून त्यांची घेतलेली भेट पाहता संभ्रमित झालेले मतदार तोच पॅटर्न कायम राखू शकतात. तसं घडल्यास त्याचा फायदा सुळेंना होईल.

बारामतीत यंदा प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात पडलेली फूट यानंतर पवार कुटुंब प्रथमच निवडणुकीला सामोरं जात असून त्यात सु्प्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. या लढतीला शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या संघर्षाचीही किनार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका झाली.