मतदान संपल्यानंतर रात्री हवेत गोळीबार

0
129

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून गोळीबाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भररस्त्यात अनेक ठिकाणी गोळीबाराचे प्रकरणं समोर आले आहेत. त्यातच आता बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान संपताच पुण्यातील वारजे परिसरात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली.

आरोपींनी हवेत गोळीबार केला असून, गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. गोळीबार करणारे आरोपी कात्रजच्या दिशेने पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. हवेत केलेल्या गोळीबाराने काही वेळ परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. लोकांमध्ये खळबळ उडाली होती.

वारजे माळवाडी येथील रामनगर भागात एक दोन नाही तर तिघे जण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी हवेत गोळीबार केला. साधारण रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. काल बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. पुण्यातील वारजे हा परिसरात बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. सगळं मतदान सुरळीत पार पडल्यानंतर ही घटना घडली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

मतदानाचं सगळं वातावरण शांत झाल्यानंतर हा प्रकार घडला. या तिघांनी गाडीवरुन येऊन हवेत गोळीबार का केला?, याचं कारण समजू शकलं नाही. गोळीबार करुन पसार झाल्याने तिघांचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. परिसरातील सगळे सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासलं जात आहे. तिघांचाही शोध घेणं सुरु आहे. तिन्ही आरोपी सापडल्यानंतर त्यांनी हा प्रकार नक्की का केला असावा, याचं कारण स्पष्ट होईल.

पुणे जिल्ह्यात गोळीबार करणं आता नेहमीचं झालं असल्याचे मागील काही दिवसांच्या घटनांवरून समोर येत आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून असलेलं पुणे आता गोळीबारांच्या घटनांवरून चर्चेत येत आहे. मागील मागील आठवड्यातच पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ रात्रीच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हॉटेलमध्ये घुसून जेवणाला बसलेल्या या तरुणाची हत्या करण्यात आली. यापूर्वी देखील सतत पुण्यात अशा गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. आता तर क्रिकेटच्या वादातून गोळीबार केला जात असल्याचे समोर आले आहे.