मतदान यंत्रांच्या ‘कमिशनिंग’ प्रक्रियेला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात  

0
205

पिंपरी (दि १६) – चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे तयार करण्याची (कमिशनिंग) प्रक्रिया आज (बुधवार) सुरु झाली. यामध्ये 714 कंट्रोल युनिट, 1428 बॅलेट युनिट आणि 765 व्हीव्हीपॅट अशा एकूण 2907  मतदान यंत्रांचा समावेश आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी थेरगाव येथील स्व. शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सर्व मतदान यंत्रे आणण्यात आली आहेत. याठिकाणी निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या विशेष उपस्थितीत कमिशनिंग प्रक्रियेला सुरुवात झाली. उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. ईव्हीएम सिलिंगची प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्यात येणार असून प्रत्यक्ष निवडणुक मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक सर्व प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी निवडणूक विभागाचे प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध कामकाज सुरु आहे.

थेरगाव येथील स्व. शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूमची पाहणी केली. तसेच या ठिकाणी असलेल्या सुरक्षेचा आढावा घेऊन सुरक्षा विषयक संबंधितांना सूचना दिल्या. तसेच या भवनामध्ये सुरु असलेल्या मतदान यंत्राच्या कमिशनिंग प्रक्रियेची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सूचना दिल्या. तसेच मतदान केंद्र क्रमांक 61 च्या सर्व कमिशनिंग प्रक्रियेची तपासणी आणि खात्री करून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्वतः या केंद्राचे ईव्हीएम सिलिंग केले.

14 फेब्रुवारी रोजी 714 कंट्रोल युनिट, 1428 बॅलेट युनिट आणि 765 व्हीव्हीपॅट अशा एकूण 2907 मतदान यंत्रांची संगणकीय प्रणालीद्वारे मतदान केंद्रनिहाय द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली होती. त्याप्रमाणे मतदान यंत्रांची संगती करण्यात आल्यानंतर कमिशनिंग प्रक्रियेला प्रारंभ झाला.

प्रारंभी, मतदान यंत्राबद्दल निवडणूक कामकाज करणाऱ्या सेक्टर अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना तज्ञ चंद्रकांत ढवळे आणि मुसाक काझी यांनी तांत्रिक माहितीचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. दिव्यांग बांधवांना मतदान करणे सोयीचे व्हावे यादृष्टीने बॅलेट युनिटवरील ब्रेल लिपी मध्ये असलेले दिशादर्शक स्टिकर आणि इतर ब्रेल लिपीची सविस्तर माहिती पताशीबाई मानव कल्याण अंधशाळा भोसरीचे मुख्याध्यापक पांडुरंग साळुंखे यांनी प्रशिक्षणार्थींना दिली. त्यानंतर ईव्हीएम सिलिंगच्या प्राथमिक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. निवडणुकीसंबंधी सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग कटिबद्ध असून उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना देखील ही संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवण्यात आली.