मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया

0
44

थेरगाव, दि. ०८ (पीसीबी)- चिंचवड विधानसभा मतदारसंघात २१ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात असून ५६४ मतदान केंद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून आज संपन्न झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयाच्या बापुजी बुवा सभागृह, थेरगाव येथे पार पडलेल्या द्वितीय सरमिसळ प्रक्रियेवेळी निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, किशोर ननवरे यांच्यासह संबधित कक्षाचे समन्वय अधिकारी आणि उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रारंभी, निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रीयेची माहिती दिली. तद्नंतर सरमिसळ प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांनी देखील उपस्थित उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.

चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी १३५३ बॅलेट युनिट, ६७६ कंट्रोल युनिट आणि ७३३ व्हीव्हीपॅट मशीन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाले आहेत. त्यांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून आज करण्यात आली. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ५६४ मतदान केंद्रे आहेत. या मतदारसंघात २१ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ५६४ मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी २ बॅलेट युनिट, १ कंट्रोल युनिट व १ व्हीव्हीपॅट यंत्रे वाटप करण्यात आली असून २२५ बॅलेट युनिट, ११२ कंट्रोल युनिट आणि १६९ व्हीव्हीपॅट यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत.