मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ

0
103

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक श्री. बुदिती राजशेखर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्यासह उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेवेळी ईव्हीएम नोडल अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांच्यासह मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे समन्वय अधिकारी निळकंठ पोमण, निवडणूक सहाय्यक अभिजीत जगताप, सचिन मस्के, मावळ विधानसभा निवडणूक कार्यालयाच्या समन्वय अधिकारी पूनम कदम, चिंचवड विधानसभा निवडणूक कार्यालयाचे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, पिंपरी विधानसभा निवडणूक कार्यालयाचे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराम देशमुख, पनवेल विधानसभा निवडणूक कार्यालयाचे प्रतिनिधी विनय पाटील तसेच कर्जत, उरण विभानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रांसाठी ९ हजार २३६ बॅलेट युनिट, ३ हजार ५९१ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८१६ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये ५४४ मतदान केंद्रे असणार आहेत. त्याकरिता १ हजार ९५८ बॅलेट युनिट, ७५० कंट्रोल युनिट आणि ७८८ व्हीव्हीपॅट लागणार आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये ३३९ मतदान केंद्रे असणार आहेत. त्याकरिता १ हजार २२० बॅलेट युनिट, ४६७ कंट्रोल युनिट आणि ४९१ व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर उरण विधानसभा मतदारसंघामध्ये ३४४ मतदान केंद्रे असून त्याकरिता १ हजार २३८ बॅलेट युनिट, ४७४ कंट्रोल युनिट आणि ४९८ व्हीव्हीपॅट लागणार आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये ३९० मतदान केंद्रे आहेत. त्याकरिता १ हजार ४०४ बॅलेट युनिट, ५५३ कंट्रोल युनिट आणि ५९२ व्हीव्हीपॅट आवश्यक आहेत. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये ५४९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्याकरिता १ हजार ९७६ बॅलेट युनिट, ७७९ कंट्रोल युनिट आणि ८३९ व्हीव्हीपॅट लागणार आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये ४०० मतदान केंद्रे असून त्याकरिता १ हजार ४४० बॅलेट युनिट, ५६८ कंट्रोल युनिट आणि ६०८ व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी राखीव यंत्रांसह आवश्यक असलेल्या मतदान यंत्रांची पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघनिहाय द्वितीयस्तरावरील सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया आज पार पडली.