मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ

0
64

पिंपरी, दि. ९ – पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात असून ३९८ मतदान केंद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून आज संपन्न झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.
प्रारंभी, निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली. तद्नंतर सरमिसळ प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक निरिक्षक मनवेशसिंग सिध्दू, यांनी देखील उपस्थित उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.
डॉ.हेडगेवार भवन, से.क्र.२६ निगडी प्राधिकरण येथे पार पडलेल्या द्वितीय सरमिसळ प्रक्रियेवेळी निवडणूक निरिक्षक मनवेशसिंग सिध्दू, पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, समन्वय अधिकारी- मुकूंद पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी – जयराज देशमुख, नोडल अधिकारी तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी प्रशांत शिंपी, संतोष कुदळे, सत्वशील शितोळे, विजय बोरुडे यांच्यासह संबधित कक्षाचे समन्वय अधिकारी आणि उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघासाठी ४७७ बॅलेट युनिट, ४७७ कंट्रोल युनिट आणि ५१७ व्हीव्हीपॅट मशीन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाले आहेत. त्यांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून आज करण्यात आली. पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३९८ मतदान केंद्रे आहेत. या मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ३९८ मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी १ बॅलेट युनिट, १ कंट्रोल युनिट व १ व्हीव्हीपॅट यंत्रे वाटप करण्यात आली असून ७९ बॅलेट युनिट, ७९ कंट्रोल युनिट आणि ११९ व्हीव्हीपॅट यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत.
त्याचप्रमाणे आज दि.०८ नोव्हेंबर २०२४ रोजी द्वितीय सरमिसळ प्रक्रिया (रँडमायझेशन) झाल्यानंतर, मतदान यंत्रांचे जुळवणी व ‍सिम्बॉल लोडींग दि.१० व दि.११ नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. व दि. १३ नोव्हेंबर २०२४ ते दि.१४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ईव्हीएम मतदानासाठी तयार करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे