मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता आमदार लक्ष्मण जगताप रवाना

0
277

पिंपरी , दि. १० (पीसीबी) – राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. मतदानासाठी सर्व पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी एकही आमदार बाहेर राहू नये किंवा मत वाया जाऊ नये यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत. यादरम्यान भाजपाचे एक आमदार चक्क रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

पुण्यातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त असतानाही मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव लक्ष्मण जगताप मतदान प्रक्रियेत सहभागी होणार की नाही असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून होता. अखेर ते रुग्णवाहिकेतून मुंबईसाठी रवाना झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले लक्ष्मण जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दीड महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना २ जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना एअर अँब्युलन्समधून नेणार असल्याची चर्चा होती. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला असून त्यांना रस्त्याने नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू शंकर जगताप आहेत.