वारजे परिसरात मतदान संपल्यानंतर दहशत पसरविण्यासाठी गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनने पिंपरी मधून अटक केली. आरोपीकडून गोळीबार केलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
सिद्धप्पा येळसंगेकर (वय 35, रा. येळसंगी, ता. आळंद जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गोळीबार प्रकरणी पोलीस अंमलदार हेमकांत पवार यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वारजे मधील काही भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. मंगळवारी (दि. 7) बारामती लोकसभेसाठी मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र मतदान झाल्यानंतर रात्री अकरा वाजताच्या सुमारास वारजे परिसरातील रामनगर मधील शक्ती चौकात तिघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी हवेत गोळीबार केला. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. गोळीबाराच्या घटनेने वारजे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबार केल्यानंतर तिघेजण कात्रजच्या दिशेने पळून गेले.
पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी काही वेळेत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. मात्र त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला. गोळीबार झालेले ठिकाण मतदान केंद्रापासून दूर अंतरावर होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेशी या घटनेचा काहीही संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पुणे पोलिसांकडून पिंपरी चिंचवड पोलिसांना देखील माहिती देण्यात आली होती. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याबाबत गुन्हे शाखांना अलर्ट दिला होता. दरम्यान, बुधवारी (दि. 8) रात्री पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ एकजण पिस्टल घेऊन आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सिद्धप्पा याला ताब्यात घेतले.
सिद्धप्पा याच्याकडून पोलिसांनी पिस्टल जप्त केले. तसेच त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वारजे येथे मंगळवारी रात्री गोळीबार केल्याचे सांगितले. आरोपी सिद्धप्पा याने त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांसोबत मिळून वारजे येथे गोळीबार केला. त्यानंतर त्याचे दोन अल्पवयीन साथीदार पकडले गेले. पोलिसांपासून लपण्यासाठी तो बुधवारी पिंपरी चिंचवड परिसरात आला. बुधवारी रात्री पिंपरी मधील एका ठिकाणी तो लपून दारू पीत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
सिद्धप्पा याच्यावर गुलबर्गा जिल्ह्यातील येळसंगी पोलीस ठाण्यात खुनाचे दोन गुन्हे दाखल असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांकडून याबाबत खातरजमा केली जात आहे. पिस्टल बाळगल्या प्रकरणी सिद्धप्पा याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









































