मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक साहित्य वितरण

0
2

थेरगाव, दि. १९ (पीसीबी) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या बुधवार दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी चिंचवडमधील मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक साहित्य वितरण आज पार पडले असून सर्व पथके विहीत वेळेत मतदान केंद्रांकडे रवाना झाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३ हजार १३० अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ४८ सेक्टर ऑफिसर्सची नेमणूक करण्यात आली आहे. आज थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे कामगार भवन येथून सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वितरण प्रक्रियेला सुरूवात झाली. प्रारंभी सर्व मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांना तिसरे अंतिम प्रशिक्षण देऊन मतदान प्रक्रियेबद्दल तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार असून ५६४ मतदान केंद्रे आहेत. यासाठी आवश्यक असणारे १३५३ बॅलेट युनिट, ६७६ कंट्रोल युनिट आणि ७३३ व्हीव्हीपॅट यंत्र मतदान पथकनिहाय ताब्यात देण्यात आले. तसेच ५६४ मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी २ बॅलेट युनिट, १ कंट्रोल युनिट व १ व्हीव्हीपॅट यंत्रे वाटप करण्यात आली असून २२५ बॅलेट युनिट, ११२ कंट्रोल युनिट आणि १६९ व्हीव्हीपॅट यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. यासोबतच विविध लिफाफे, स्टेशनरी, ओआरएससह प्रथमोपचारपेटी, दिशादर्शक फलक, मतदान प्रक्रीया पार पाडण्यासाठी आवश्यक साहित्य, विविध अहवालाच्या प्रती आणि मार्गदर्शक सूचना साहित्य देखील यावेळी सुपूर्द करण्यात आले. या पथकांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. बसेस, जीप तसेच इतर वाहनांवर केंद्र क्रमांक दर्शविण्यात आला होता.

यावेळी नियोजनबद्ध पद्धतीने साहित्याचे वितरण करून पथकांना वाहनांमध्ये बसवून विहीत वेळेत केंद्रस्थळी पोहोचविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात आले व साहित्य वाटपाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय प्रत्येक पथकासोबत स्वतंत्र पोलीस पथके देण्यात आली आहेत.