मणिपूर हिंसाचार । शीर कापून बांबूच्या कुंपणावर ठेवलं…व्हिडीओमुळे खळबळ

0
367

मणिपूर, दि. २२ (पीसीबी) – मणिपूरमध्ये आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मणिपूरमधील घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट असतानाच हा व्हिडीओ समोर आल्याने धक्का बसला आहे. व्हिडीओत कुकी समाजातील एका व्यक्तीचं शीर कापून ठेवण्यात आल्याचं दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये कुकी समाजातील एका व्यक्तीचे कापलेले डोके बांबूच्या कुंपणाला लटकलेले दिसत आहे. डेव्हिड थेक असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा व्हिडिओ बिष्णुपूर जिल्ह्यातील आहे. यामध्ये कुकी समाजातील डेव्हिड थेकचे छिन्नविछिन्न शीर एका निवासी भागात बांबूच्या कुंपणावर ठेवलेले दिसत आहे. 2 जुलै रोजी झालेल्या हिंसाचारात डेविडची हत्या करण्यात आली होती. या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला.

बुधवारी तीन महिलांना नग्न करून त्यांची हजारांच्या जमावाने परेड काढली होती. त्यांच्या भावाला आणि वडिलांची हत्या केली गेली होती. यानंतर एका तरुणीवर सामुहिक बलात्कार केला गेला होता. सर्वात धक्कादायक म्हणजे पोलिसांसमोरच हे सारे घडले होते.

कुकी समाजाने काढलेल्या ‘आदिवासी एकता मार्च’ दरम्यान मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचार झाला होता. यादरम्यान कुकी आणि मेईतेई समुदायामध्ये हिंसक हाणामारी झाली. तेव्हापासून तेथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 150 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.