मणिपूर भडकले, हिंसाचारात ४० विद्यार्थी जखमी

0
54

इंफाळ,दि. ११ (पीसीबी)
मणिपूरमध्ये मंगळवारी विद्यार्थ्यांनी राजभवनावर काढलेल्या मोर्चाहा हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रुधुराचा मारा केला. यात किमान ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत. दुसरीकडे कंगपोकी जिल्ह्यात दोन सशस्त्र गटांमधील गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने तणावात भर पडली आहे. थंगबु या दुर्गम खेड्यात जमावाने काही घरे जाळल्याने ग्रामस्थांनी गावाबाहेर पळ काढावा लागला आहे. दरम्यान हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तीन जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला असून यावेळी ड्रोन, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आदी वापरून हल्ले करण्यात येत आहेत. पोलिसांनीही क्षेपणास्त्राचे काही तुकडे सापडल्याचे मान्य केले आहे. आसाम रायफल्सचे निवृत्त महासंचालक जनरल पी,सी.नायर यांनी हल्ल्यात रॉकेट किंवा ड्रोनचा वापर केला जात नसल्याचे म्हटले असले तरी मणिपूरचे पोलीस महासंचालक (प्रशासन) के. जयंत सिंह यांनी हा दावा फेटाळत अत्याधुनिक शस्त्रांच्या वापराचे पुरावे असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी राजभवनकडे निघालेल्या मोर्चेकरी विद्यार्थ्यांची सुरक्षा दलांबरोबर चकमक झडली. यात किमान ४० विद्यार्थी जखमी झाले. पोलीस महासंचालक तसेच राज्य सरकारच्या सुरक्षा सल्लागारांना हटविण्याची या विद्यार्थ्यांची मागणी आहे. निदर्शकांनी घोषणाबाजी करत सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी जवानांनी अश्रुधुराचा वापर केला. मणिपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही आंदोलन केले. थोंगबल येथे निदर्शकांनी जिल्हा पोलीस मुख्यालयावर चालून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमाव हिंसक झाला. न्यायालय परिसरातील काही वाहनांचे नुकसान केले. जखमींना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवर दगडफेक करण्यात आली.

मणिपूरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये आज आणि उद्या बंद ठेवण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. यावेळच्या आंदोलनात विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठांत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दोन दिवस सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येणार आहेत.

इंटरनेट बंदीबाबत आदेशाचा घोळ
वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मणिपूरमध्ये पाच दिवस इंटरनेट बंद ठेवण्याचा आदेश राज्याच्या गृह विभागाने काढला होता. मात्र रात्री उशिरा या आदेशात बदल करून केवळ पूर्व, पश्चिम इम्फाळ, थौबल, बिष्णूपूर आणि काकचिंग या पाच जिल्ह्यांपुरतीच ही बंदी असल्याचे सरकारने स्पष्ट केले. समाजमाध्यमावरून पाठवली जाणारी विविध छायाचित्रे तसेच प्रक्षोक्षक भाषणे, चित्रफिती रोखण्यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे.