मणिपूर घटनेच्या निषेधार्थ पिंपरीत ‘धरणे आंदोलन’

0
298

संभाजी ब्रिगेड व विवीध सामाजिक संघटनांचा सहभाग

पिंपरी,दि.२३(पीसीबी) – मागील दोन महिन्यापासून मणिपूर येथे हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व घटनेदरम्यान दोन महिलांवर अत्याचार करण्यात आला. त्यांची निर्वस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या येथे संभाजी ब्रिगेड व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मणिपूर राज्यात मागील तीन महिन्यांपासून हिंसाचार,दंगल,जाळपोळ, सैनिकांवर हल्ले आणि महिला अत्याचार सुरूच आहेत. महिलांवर झालेला सामूहिक अत्याचार किळसवाणा आणि संतापजनक आहे.या सगळ्या संतापजनक प्रकाराचा जाहीर निषेध करण्यासाठी पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या येथे संभाजी ब्रिगेड व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. देशात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. मणिपूर येथे महिलांवर झालेले अत्याचार देशाला हादरवून टाकणारे आहेत. या अत्याचारा विरोधात तमाम देशवासीयांनी पेटून उठले पाहिजे. तसेच ज्या देशात महिलांना देवी मानले जाते त्या देशात महिलांची अशी नग्न धिंड काढल्या जात असेल तर नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत यासंबंधी निवेदन द्यावे,अशी मागणी करण्यात आली. यावेळी शहर, परिसरातील नागरिक तसेच महिला वर्गाने बहुसंख्येने सहभाग नोंदविला होता.