मणिपूरमधील घटनेमुळे प्रत्येक भारतीयांची मान शरमेने खाली गेली!

0
474

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – समाजामध्ये नेहमी म्हटले जाते की जमावाला जात, धर्म पंथ नसतो. मात्र, मणिपूरमध्ये सुरू असलेल्या आरक्षणावरून दोन समाजामध्ये अत्यंत टोकाचा विरोध सुरू आहे. हा विरोध एवढा पराकोटीला गेला की एका समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून सामुहिक अत्याचार कारण्यापर्यंत गेला आहे. मे महिन्यात घडलेल्या या घटनेचा आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् समाजमन सुन्न झाले, असे मत राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस
विशाल बाळासाहेब काळभोर यांनी व्यक्त केले आहे.

प्रसिध्दीपत्रकात ते म्हणतात, जगभरात भारतीय संस्कृतीला एक वेगळं महत्त्व आहे. आपण महिलांना लक्ष्मी मातेच्या दर्जा देत असताना मणिपूरच्या त्या घटनेमुळे माझ्यासह सर्व भारतीयांची मान शरमेने खाली गेली आहे. त्यामुळे अशा घटनांकडे आपण पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून पाहणे गरजेचे असून दोषींवर कठोरात-कठोर कारवाई कशा पध्दतीने होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर पेटले असताना जनतेचे सेवक म्हणून राजकारण करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाने याकडे कानाडोळा केला, किंवा विरोधकांचा, मणिपूरमधील नागरिकांचा आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहचलाच नाही. वेळीच मणिपूर शांत केले असते तर ही दुर्दैवी घटना घडली नसती. घडलेली घटना अत्यंत निषेधार्ह आणि तितकीच चिड आणणारी आहे. त्यामुळे आता कोणत्याही राजकीय पक्षाने याकडे राजकारण म्हणून न बघता घटनेतील पिडीत महिलांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी नम्र विनंती करावी वाटते.