मक्याच्या शेतात घेतले गांजाचे पिक; दहा फूट उंचीची 66 झाडे जप्त

0
218

चाकण जवळील आगरवाडी येथील एका शेतकऱ्याने चक्क मक्याच्या शेतात गांजाचे पिक घेतले. त्याने मक्याच्या शेतात 66 गांजाची झाडे लावली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी कारवाई करत 11 लाख 50 हजार रुपये किमतीचा 23 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. 22) दुपारी करण्यात आली.

सदाशिव आप्पासाहेब देशमुख (वय 65, रा. आगरवाडी रोड, चाकण) असे गांजाचे पिक घेणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना आगरवाडी रोडवर एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गांजा लावला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, चाकण पोलिसांनी चाकण-काळूस रोडवर असलेल्या देशमुख यांच्या शेतात जाऊन खात्री केली.

त्यावेळी मक्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळून आली. तब्बल आठ ते दहा फूट उंचीची 66 झाडे पोलिसांना मिळाली. या झाडांचे वजन 23 किलो होते. तर याची किंमत 11 लाख 50 हजार रुपये आहे. पोलिसांनी गांजाची झाडे जप्त करत देशमुख याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, सहायक फौजदार सुरेश हिंगे, पोलीस अंमलदार ऋषिकुमार झनकर, संदीप सोनवणे, राजू जाधव, हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, शिवाजी चव्हाण, निखील शेटे , नितीन गुंजाळ, सुनील भागवत, संदीप गंगावणे, अशोक दिवटे, प्रदीप राळे, निखील वर्पे, रेवन्नाथ खेडकर, नवनाथ खेडकर, महादेव बिक्कड, महेश कोळी, माधुरी कचाटे यांनी केली.