मंदिरेही असुरक्षित..! गणपती मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

0
4

दि . ९ ( पीसीबी ) – उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील गजबजलेल्या आश्रम रोडवरील गणपती मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने दानपेटीतील रोख रक्कम लंपास केला आहे. आज शुक्रवारी (ता. 09) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन गावातील मुख्य रस्ता असलेल्या आश्रम रोडवर गणपती मंदिर आहे. आज सकाळी भाविक दर्शनासाठी गेले असता त्यांना दानपेटीचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत आढळून आले. आत जाऊन पाहणी केली असता दानपेटीही फोडलेली दिसली.

आश्रम रोडवरील गणपती मंदिराचे मागील काही दिवसांपासून काम सुरु असल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही बंद होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडली. भक्तांनी केलेले दानपेटीतील गुप्तदान 10 ते 12 हजार रुपये अंदाजित रक्कम त्यात ५रू, १०रू, २०रू,५०रू, १००रू, २००रू, ५००रू, अशा वर्णनाच्या चलनी नोटा व नाणी असे रक्कम चोरी करून घेऊन गेल्याचे महात्मा गांधी तरुण मंडळातील काही कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान, चोरी करून झाल्यानंतर चोरट्याने कुलूप तोडण्यासाठी वापरलेले साहित्य त्याच ठिकाणी सोडून पळ काढला आहे. याबाबत अद्याप उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली नसल्याची माहिती मिळाली आहे.