मंदिच्या झळा, अभियांत्रिकी महाविद्यालयांतील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ३० ते ४० टक्के घट

0
161

मुंबई, दि. ५ (पीसीबी) : आयआयटी-मुंबईचे ३६ टक्के विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटच्या प्रतीक्षेत असताना राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही काहीसे तसेच चित्र आहे. २०२२ मध्ये झालेल्या सर्वाधिक कॅम्पस प्लेसमेंटनंतर गेल्या दोन वर्षांत प्लेसमेंटला उतरती कळा लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ३० ते ४० टक्के घट झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अमेरिकेतील आर्थिक मंदीसदृश स्थिती, निवडणुका, रशिया-युक्रेन युद्ध अशा घटकांचा परिणाम कंपन्यांच्या नोकरभरतीवर झाला आहे. माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात सर्वाधिक नोकरभरती होते. मात्र त्यात आता घट झाली आहे. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरभरती करणाऱ्या कंपन्यांनी त्यांची नोकरभरती जवळपास सहा महिने विलंबाने सुरू केली आहे. गेल्या दहा वर्षांतील नोकरभरतीचा आढावा घेतला असता २०२२ मध्ये सर्वाधिक नोकरभरती झाली होती. उत्पादन क्षेत्रातील कंपन्या किंवा माहिती तंत्रज्ञान उत्पादन निर्मिती कंपन्यांतील नोकरभरती सुरू आहे. मात्र, माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील नोकरभरती रोडावली आहे, अशी माहिती महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्सचे अध्यक्ष डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी दिली.

‘राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील नोकरभरतीमध्ये तीस ते चाळीस टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, वर्षाच्या उत्तरार्धात थोडा बदल होण्याची शक्यता आहे. काही कंपन्यांकडून ‘ऑफ कॅम्पस’ नोकरभरती केली जाण्याची शक्यता आहे. त्यात मोठ्या कंपन्या सहभागी होऊन नोकरभरतीचा टक्का वाढू शकतो,’ असेही त्यांनी सांगितले.

राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्लेसमेंट अधिकारी संतोष बोर्डे म्हणाले, की करोनानंतर गेल्या दीड वर्षात आयटी कंपन्यांमधील प्लेसमेंटचे प्रमाण कमी झाले आहे. कंपन्यांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केलेल्या, रोजगारक्षम विद्यार्थी घडणाऱ्या, किमान सहा महिने इंटर्नशिप असलेल्या महाविद्यालयांत प्लेसमेंटचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत आहे. पुण्यातील केवळ २० टक्के महाविद्यालयातील प्लेसमेंट प्रक्रिया सुरळीत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्लेसमेंटचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. असे असूनही आजही सर्वाधिक नोकऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातच आहेत.