दि. ३ ( पीसीबी ) – मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही तरुणींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सात आरोपींपैकी तीन जणांना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेतील आरोपींमध्ये भाजपचा माजी नगरसेवक पीयूष मोरे देखील आहे, जो सध्या शिवसेना शिंदे गटात आहे. काही दिवसांपूर्वीच तो शिवसेना शिंदे गटात सहभागी झाला होता.
याशिवाय, अनिकेत भोई हा शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख छोटू भोई यांचा पुतण्या असून, त्याच्यावर याआधी गुंडगिरी आणि गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत. सचिन पालवे हा देखील शिंदे गटाचा युवा शहरप्रमुख आहे.
महाशिवरात्रीनिमित्त कोथळी येथे संत मुक्ताबाई यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या यात्रेत फराळ वाटप करत असताना अनिकेत भोई नावाच्या तरुणाने तिचा पाठलाग केला. सायंकाळी ती आपल्या मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी गेली असताना, भोई आणि इतर काही तरुणांनी पुन्हा पाठलाग केला आणि ज्या पाळण्यामध्ये ती बसली, त्याच पाळण्यात बसण्याचा प्रयत्न केला. तसेच, काही व्हिडिओ शूट करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला.
सुरक्षारक्षकाने हा प्रकार पाहताच संबंधित तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, टवाळखोरांनी सुरक्षारक्षकासोबत झटापट केली. या घटनेनंतर रक्षा खडसे आक्रमक झाल्या आणि तातडीने आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.
या प्रकरणात पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत अनुज पाटील, अनिकेत भोई आणि किरण माळी या तिघांना अटक केली आहे, तर इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून, आरोपींमध्ये सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा समावेश असल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे.












































