मंत्री नरहरी झिरवाळ यांचा लिपिक लाचखोरीत सापडला

0
3

दि.१३(पीसीबी)-लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुंबईतील मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका कार्यालयात गुरुवारी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील एका कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे.

मंत्रालयातील एका कार्यालयात ५० हजारांची लाच घेताना एका क्लर्कला अटक करण्यात आली आहे. एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. दरम्यान, थेट मंत्रालयातील एका कार्यालयातच क्लर्क अशा प्रकारे लाच घेताना आढळून आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावरूनच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर मोठं भाष्य करत थेट संबंधित कॅबिनेट मंत्र्यांला पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

“मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.