मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्यात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात असल्याचा गंभीर आरोप विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी या प्रकरणात गोरेंना अडकवण्यासाठी कोणा कोणाचा सहभाग होता यांच्या नावाचदेखील उल्लेख केला आहे.
विरोधकांच्या वतीनी विधिमंडळात मांडण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिली. यावेळी त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याच कट कशा पद्धतीने आखला गेला याची माहिती दिली. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तसेच, आपण राजकीय शत्रू नाहीत आपण राजकीय विरोधक आहोत. असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
काय म्हणाले फडणवीस?
जयकुमार गोरे यांचे प्रकरण उकरून काढण्यात आलं. एका पत्रकारासोबत संपर्क साधत गोरेंना अडकवण्याच प्रयत्न केला आणि याप्रकरणात शरद पवार पक्षाचा मोठा हात असल्याचे फडणवीसांनी म्हटले. यावेळी विरोधकांनी दंगा केला पण फडणवीसांना पुरावा असल्याचे सांगत विरोधकांना थांबवले.
तुषार खरात आणि इतरांनी जयकुमार गोरे प्रकरणात विरोधात व्हिडिओ तयार केल्यानंतर, ते व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी होईल. मात्र, त्यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आपण राजकीय शत्रू नाही तर राजकीय विरोधक आहोत. मात्र, अशा प्रकारे कोणाला जीवनातून उठवून टाकायचे, अशा प्रकारचे राजकारण होत असेल तर हे चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस यांच्या या माहितीनंतर राज्यात नवा गोंधळ सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे शरद पवार फडणवीसांच्या आरोपावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
सातारा जिलह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी 2016 पासून फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच आपल्याला त्रास दिल्याचा आरोप महिलेने केला होता. तर आपल्याला त्रास देण्यासाठी गोरे यांनी त्यांचे विवस्त्र फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले, असाही दावा सदर महिलेने केला होता.
तर होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे. पण अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांचा अटकपर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक झाली होती. ज्यानंतर गोरे यांना दहा दिवसांची जेलमध्येही जावं लागलं, असं सदर महिलेने एका पत्रात म्हटलं होतं.
पण या प्रकरणात गोरे यांची निर्दोष मुक्तता
2019 मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती. या प्रकरणानंतर जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिले होते. माझ्यावर 2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षे हा खटला सुरु होता. 2019 मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला होता. त्या निकालाची प्रत माझ्याकडे आहे.
मला या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यावेळी न्यायालयाने मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्याचे आदेश दिले होते. लोकशाहीत न्यायालय सर्वोच्च असते. हा निकाल येऊन सहा वर्षे झाली आहेत. किमान कुठल्यावेळी विषय समोर आणावा, याला राजकीय लोकांनी मर्यादा ठेवली पाहिजे, असे मला वाटते, असे जयकुमार गोरे म्हणाले होते.