मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा शिवसेनेला मोठा फटका..

0
372

 पुणे, दि. २० (पीसीबी) : विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत भारतीय जनता पक्षाचे चार उमेदवार विजयी झाले. पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयाच्या मार्गावर आहेत. मात्र, यामुळे राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेसोबत असलेल्या एकुण मतांपैकी तब्बल ११ मते कुठे गेली असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अकरापैकी तीन मते शिवसेनेची स्वत:ची होती. ही तीन मतेदेखील शिवसेना राखू शकलेली नाही, हे जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट होत आहे.

शिवसेनेच्या ५६ आमदारांपैकी एका आमदाराचे निधन झाले. आता शिवसेनेकडे स्वत:ची ५५ मते होती. यापैकी त्यांच्या दोन उमेदवारांना पहिल्या पंसतीची ५२ मते मिळाली. म्हणजे ५५ पैकी तीन मते फुटली. या शिवाय शिवसेनेसोबत असलेल्या पाच अपक्ष व इतर तीन मतांचा विचार केला तर शिवसेनेसोबत असलेली एकुण ११ मते फुटल्याचे स्पष्ट होत आहे. मतदानाच्या आधी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती. या प्रक्रियेत ते कुठेच सहभागी नसल्याचे सांगितले जात होते. ते नाराज असल्याने शिवसेनेच्या मतांवर काही परिणाम झाला का, याचा आता शोध घेण्यात येत आहे. शिवसेनेचे विजयी उमेदवार सचिन अहिर यांना याबाबत विचारले असता त्यांनी सेनेची मते फुटली नसल्याचा दावा केला. शिवसेना शिस्तबद्ध पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय वर्तुळात मात्र विधान परिषदेच्या निकालात काॅंग्रेस आणि शिवसेनेला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेकडे अपक्षांची जबाबदारी होती. या अपक्षांनी सेनेची साथ सोडल्याचे मतांवरून दिसून येत आहे.

या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी आपले उमेदवार निवडून आणण्यावर लक्ष केंद्रीत केल्याने कॉंग्रेसच्या उमेदवारांवर त्यांना लक्ष देता आले नसल्याचे स्पष्ट होत आहे. स्वत:चे ४४ इतके संख्याबळ असताना दोनपैकी कॉंग्रेसचा एकही उमेदवार पहिल्या पसंतीक्रमानुसार निवडून येऊ शकले नाहीत.

शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले असले तरी शिवसेनेची स्वत:ची तीन व सोबत असलेली आठ मते कुठे गेली याचा शोध शिवसेनेला घ्यावा लागणार आहे.महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर महाविकास आघाडीचा पराभव झाला असून शिवसेना व राष्ट्रवादी यांनी स्वत:चे उमेदवार निवडून आण्यावर लक्ष केंद्रीत केल्याने कॉंग्रेसकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.