मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने विधीमंडळ अधिवेशन पुढे ढकलले

0
310

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले असून नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी याबाबतची माहिती दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन १८ जुलै २०२२ पासून सुरू होईल असे सांगण्यात आले होते. मात्र संसदीय कार्यविभागाच्या सुचनेनूसार आता हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. अधिवेशनाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नसून संसदीय कार्य विभागाने कळविल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराचा घोळ कायम असल्यानेच अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा दोघांचेच मंत्रीमंडळ असल्याची टीका शिवसेना व राष्ट्रवादीने सुरू केल्याने शिंदे – फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात १० मंत्र्यांचा शपथविधी करायचा निर्णय केला आहे.

१८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक देखील होणार आहे. त्यामुळे विधानसभेचे आमदार त्यादिवशी मतदानासाठी सभागृहात हजेरी लावणार असून अधिवेशनासाठी पुन्हा मुंबईत यावे लागण्याची शक्यता आहे. त्याचवेळी संसदेचे पावसाळी अधिवेशन मात्र १८ जुलैपासूनच सुरु होणार आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे १९ जुलैपासून सभागृहाचे नियमित कामकाज सुरु होणार आहे.

दरम्यान अधिवेशन पुढे ढकलण्याच्या निर्णयामागे लांबलेला मंत्रिमंडळाचा विस्तार असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ४ जुलै रोजी विशेष अधिवेशनात शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव देखील जिंकला. यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे भाजपामधून सांगण्यात आले . दरम्यान, पहिल्या टप्प्यात 10 मंत्री घेणार शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाचे पाच तर आणि भाजपचे पाच मंत्री घेणार शपथ घेणरा असल्याची माहिती ‘साम’ या वृत्तवाहिनीने दिली आहे. अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर आधी 10 मंत्र्यांना शपथ देणार असून अधिवेशन संपले की दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.