मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता मावळली

0
101

मुंबई, दि. १७ जुलै (पीसीबी) : 2024 च्या लोकसभा निवडणूकीच्या पाठोपाठ विधानपरिषदेची निवडणुकही पार पडली. परंतु महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे गणित अद्यापही सुटलेलं नाही. अशातच आता राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मंत्री होऊ पाहणाऱ्या आमदारांच्या स्वप्नांवर पाणी फिरणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु यावर मुख्यमंत्री शिंदेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार होणार काळजी करू नका

एकीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेला दुजोरा दिला आहे ते म्हणाले की, ”राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे काळजी करू नका.” त्यामुळे आता तीन महिन्यांसाठी मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्षं असणार आहे.दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे तत्काळ दिल्लीला गेले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील (10 जुलै) रोजी कृषी विभागाच्या कार्यक्रमानिमित्त दिल्लीत होते. त्यांनी सुद्धा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या दिल्ली वारीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलं होतं.

राज्यात तब्बल दोन वर्षांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. त्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. पुढे जाऊन अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाला आणि शिंदेंच्या नेत्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले.