मंत्रीमंडळ बैठकित अब्दूल सत्तार यांना फडणवीसांनी झापले

0
223

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार स्थापन होऊन जवळपास सव्वा दोन महिने उलटून गेलेत तर मंत्रिमंडळ विस्तार होऊनही महिनाभराचा कालावधी लोटलाय. या काळात सवंग लोकप्रियतेसाठी काही मंत्र्यांनी परस्पर काही योजनांबद्दल नव्याने घोषणा केल्या. अशा उतावीळ मंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत खडे बोल सुनावले तर काही मंत्र्यांना रोखठोक शब्दात झापले. योजनांबद्दल घोषणा करताना तुम्ही अगोदर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणं अपेक्षित आहे. इथून पुढे घोषणा करताना अगोदरच आमच्याशी चर्चा करा, असे आदेशच फडणवीसांनी मंत्र्यांना दिले. फडणवीसांच्या रागाचा रोख हा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे होता. कारण पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही नवीन योजना सुरु करण्याचा विचार असल्याचं कृषिमंत्री सत्तार यांनी माध्यमांना सांगितलं होतं. याच विषयावरुन फडणवीसांनी सत्तारांना जाब विचारत धारेवर धरलं.

अगोदरच्या सरकारच्या काळात कामे होत नव्हती, निधी मिळत नव्हता, असा आरोप शिवसेनेच्या अनेक आमदारांनी केला. त्यानंतर शिवसेनेचा एक गट फुटून राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. सरकार सत्तेवर आल्यापासून प्रसिद्धीलोलुप मंत्र्यांनी घोषणांचा सपाटा लावला आहे. मात्र मंत्र्यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता करताना सरकारला जिकीरीचं झालं आहे. काही मंत्री परस्पर नवनव्या घोषणा करत असल्याने कायद्याच्या कसोटीवर टिकण्याबरोबरच आर्थिक नियोजन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यादरम्यान अनेक विभागांनी संबंधित मंत्र्यांच्या तक्रारी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे केल्या. त्यानंतर फडणवीसांनी थेट हा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत मांडून उतावीळ मंत्र्यांची कोंडी केली.