दि.१३(पीसीबी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तरी सरकारी बंगल्यातून काही त्यांचा पाय निघताना दिसत नाही. मंत्रिपद गेल्यानंतरही धनंजय मुंडे हे अद्याप सरकारी बंगल्यातच राहत आहेत. अशा बातम्या गेल्या आठवड्यात माध्यमात आल्या होत्या. त्यानंतर आता मुंबई गिरगाव चौपाटी इथं त्यांचा आलिशान फ्लॅट असल्याचं देखील समोर आलं आहे. त्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
गिरगाव चौपाटी येथील एन एस पाटकर मार्गावरील वीरभवन इमारतीत धनंजय मुंडे यांच्या फ्लॅट असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, त्यांनी निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संबंधित घराचा उल्लेख केला होता. वीरभवन इमारतीत नवव्या मजल्यावर तब्बल दोन हजार चौरस फुटापेक्षा अधिक आलिशान फ्लॅट आहे. या इमारतीत 902 क्रमांकाचा मुंडे यांचा फ्लॅट असल्याचं समोर येत आहे. आता स्वतःचा अलिशान फ्लॅट असतानाही मुंडे सरकारी बंगल्यात का राहतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसंच त्यांचा हा फ्लॅट वापराविना पडूनच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर या फ्लॅटची किंमत तब्बल 16 कोटी 50 लाख रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
गिरगाव चौपाटी येथील हा फ्लॅट धनंजय मुंडे आणि त्यांची पत्नी राजश्री यांच्या नावावर आहे. 16 कोटी 50 लाख रुपये किंमतीचा हा फ्लॅट धनंजय मुंडे यांनी डिसेंबर 2023 मध्ये खरेदी केला आहे. मात्र, फ्लॅटमध्ये कोणी राहत नाही. हा फ्लॅट खरेदी केल्यापासून तो वापराविना पडून आहे. दरम्यान, धनंजय मुंडे सरकारी बंगल्यात राहत असल्यामुळं त्यांना 42 लाखाचा दंड लागला आहे. परंतु दंडाची रक्कम माफ करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. तर धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद हे छगन भुजबळ यांना दिलं आहे. मात्र असं असतानाही छगन भुजबळ यांना अजूनही सरकारी बंगला मिळाला नाही.
दरम्यान, आता सरकारी निवासस्थान संदर्भात धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मुंबई शहरातील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केलं नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्यायोग्य नसून, त्याठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणं गरजेचं आहे. मात्र या परिसरात तातडीनं भाड्यानं घर मिळणं सध्या कठीण आहे, माझा शोध ही सुरु आहे. तसंच माझ्या सदनिकेचं काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून, तशी शासनाकडे विनंती केली आहे, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.