“मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत?”

0
325

– शिवसेनेचा शिंदे मंत्रीमंडळावर तुफानी हल्ला,हे दोन्ही बाजूचे ‘नाकी नऊ’ मंडळ
मुंबई, दि. १० (पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा दिल्लीवारी आणि तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिवसेनेनं कठोर शब्दांमध्ये राज्य सरकारवर टीका केली आहे. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेपासून ते नव्याने मंत्री झालेल्या १८ जणांवर असणाऱ्या आरोपांचा संदर्भ देत शिवसेनेनं या मंत्रीमंडळ विस्तारानंतर “मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत?” असा प्रश्न विचारला आहे. संजय राठोड यांना देण्यात आलेली शपथ, दिल्ली वाऱ्या, नीति आयोगाच्या बैठकीमधील फोटो या साऱ्या गोष्टींचा संदर्भ देत शिवसेनेनं शिंदे सरकारवर टीका केली आहे.

राज्यपालांना लगावला टोला…
“अखेर ४० दिवसांनंतर शिंदे-फडणवीसांचे सरकार बाळंत झाल्याचे पेढे वाटण्यात आले, पण पाळण्यात नक्की काय आहे? ते समजायला मार्ग नाही. भाजपा व शिंदे गट मिळून १८ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मंत्र्यांना शपथ देताना राज्यपाल महोदयांचा चेहरा आनंदाने न्हाऊन निघाला होता. फार मोठे ईश्वरी कार्य आपल्या हातून पार पडल्याचा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, पण राज्यपाल महोदयांनी ४० दिवसांपूर्वी एका बेकायदा सरकारला शपथ दिली व आता त्याच बेकायदा सरकारच्या मंत्र्यांना शपथ देऊन घटनेचा अपमान केला आहे. शिंदे व त्यांच्या गटावर पक्षांतर बंदी कायद्याच्या कारवाईची तलवार लटकते आहे. सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू असताना त्यातील काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ देणे हा लोकशाही व घटनेचा खून आहे, पण असे खुनी सध्या देशभरात मोकाट सोडून त्यांच्या माध्यमातून राज्य चालवले जात आहे,” असा घणाघात शिवसेनेनं शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावर बोलताना केलाय.

विश्वासघाताचे पाप धुतले जाईल काय?
“मुळात शिंदे-फडणवीसांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर मंत्रिमंडळ विस्तारास इतका विलंब का लागला? आता ही परिस्थिती व घटनात्मक पेच कायम असताना या मंडळींनी शपथ घेतली. मग हीच शपथ त्यांनी आधी का घेतली नाही? फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की, १५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ निर्माण होईल. १२ ऑगस्टला आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टात ‘जजमेंट डे’ आहे. म्हणजे निकाल येईल व त्याआधी हा शपथविधी संपन्न होत आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची भीती नाही. सर्वकाही मनाप्रमाणे होईल, असा आत्मविश्वास फसफसून बाहेर पडला आहे. तो कशाच्या जोरावर? राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावीत, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा अशा मंडळींनी भाजपाकडून शपथा घेतल्या. शिंदे गटाकडून संदिपान भुमरे, संजय राठोड, दादा भुसे, गुलाब पाटील, तानाजी सावंत, उदय सामंत, शंभुराज देसाई, दीपक केसरकर अशांचे घोडे गंगेत न्हाले, पण गंगेत डुबकी मारून तरी यांच्या विश्वासघाताचे पाप धुतले जाईल काय?” असा प्रश्न शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून विचारला आहे.

शिंदे यांची तरी काय प्रतिष्ठा राहिली आहे?
“ज्यांच्या पाठीवर मंत्रिपदाची झुल पडली ते आनंदात असले तरी हा त्यांचा आनंद औटघटकेचाच ठरण्याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा विश्वासघाताची उडी मारूनही ज्यांना मंत्रिपदे मिळाली नाहीत त्यांचे समाधान कसे करणार? इकडे काय किंवा तिकडे काय ते असंतुष्टच राहणार आहेत. यातले अनेक जण ‘ईडी’च्या भयाने कातडी वाचविण्यासाठी बेइमान झाले. त्यांना सर सलामत राहिले याच लेनदेनवर दिवस ढकलावे लागतील. मात्र त्यांच्यावर लागलेला गद्दारीचा कलंक कधीच पुसला जाणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांची तरी काय प्रतिष्ठा राहिली आहे? महिनाभरात त्यांना दिल्लीत सात हेलपाटे मारावे लागले तेव्हा कोठे काल मंत्रिमंडळाचा विस्तार ते करू शकले,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

राज्याला काय फरक पडणार?
“शिंदे दिल्लीत नीति आयोगाच्या बैठकीत गेले. बैठक संपल्यावर ‘टीम इंडिया’चा म्हणून पंतप्रधानांबरोबर सामुदायिक फोटो प्रसिद्ध झाला, तो स्वाभिमानी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारा आहे. पंतप्रधान मोदींबरोबरच्या छायाचित्रात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे हे तिसऱ्या रांगेत उभे आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. दिल्लीच्या दरबारात औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना पाच हजारी मनसबदारांच्या रांगेत उभे करताच छत्रपतींचा स्वाभिमान जागा झाला व ते ताडकन दरबारातून बाहेर पडले. शिवरायांना अटक झाली, पण त्यांनी दिल्लीच्या बादशाहीपुढे मान तुकवली नाही. हा इतिहास आम्ही पिढ्यान् पिढ्या सांगत आहोत. त्या इतिहासाचे साफ मातेरे आजच्या मुख्यमंत्र्यांनी केले. महाराष्ट्राला स्वतःचा एक मान आहे. बाकी सर्व राज्ये आहेत. महाराष्ट्रात ‘राष्ट्र’ आहे व त्या शिवरायांच्या राष्ट्रास दिल्लीने मागच्या रांगेत उभे करून शिंदे यांना त्यांच्या मांडलिकत्वाची जाणीव करून दिली. अशा या मांडलिक राजाचे मंत्रिमंडळ सत्तेवर असले काय किंवा नसले काय, राज्याला काय फरक पडणार?” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“महाराष्ट्रास अर्धेमुर्धे मंत्रिमंडळ लाभले आहे इतकेच, पण ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही ते किती काळ गप्प बसतील, हाच खरा प्रश्न आहे! जळगावात गुलाबराव पाटील विरुद्ध चिमण पाटलांत ‘राडा’ होणारच आहे. सावंतवाडीत दीपक केसरकर यांची लायकी राणेंच्या मुलांनी काढल्यावर केसरकर कोशात गेले आहेत, पण शिंदे यांनी कोशातून बाहेर काढून केसरकरांना मंत्रिपदाची शपथ दिली. आता सिंधुदुर्गात राणे विरुद्ध केसरकर या जुन्याच भांडणाला नवा रंग चढेल. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या दोन्ही बाजूंचे नऊ-नऊ असे मंत्री घेतले. हे दोन्ही बाजूचे ‘नाकी नऊ’ मंडळ राज्याच्या कल्याणासाठी नक्की काय करणार आहे?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.

… तर सत्तार यांनी शिंदे गटाचाही त्याग करायला मागेपुढे पाहिले नसते
“शिंदे गटाचे जे लोक मंत्री झाले ते महाविकास आघाडीतही मंत्री होतेच. त्यातील राठोड यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप भाजपानेच केले होते. भाजपाच्या आरोपांमुळेच राठोड यांना मंत्रिमंडळातून वगळावे लागले होते. फडणवीस व त्यांच्या लोकांनी पुण्यातील एका महिलेच्या आत्महत्या प्रकरणात राठोड यांना सळो की पळो करून सोडले. आता तेच राठोड फडणवीस यांच्या मांडीस मांडी लावून बसतील. भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये टाकून त्यांना स्वच्छ करण्यात आले. गिरीश महाजनांची मारहाण, खंडणी, अपहार अशी प्रकरणे सीबीआयकडे आहेत. म्हणजे घरच्या घरीच चौकशी सुरू आहे. अब्दुल सत्तार यांच्या कुटुंबियांचे नाव ‘टीईटी’ घोटाळ्यात आले. तरीही शिंदे यांनी सत्तार यांना मंत्री केले. नाही तर सत्तार यांनी शिंदे गटाचाही त्याग करायला मागेपुढे पाहिले नसते,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

या सरकारच्या चारित्र्य व प्रतिमेचाच घोटाळा
“विजयकुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप आहेत. शिंदे यांचा गटच मुळी अनीती व पापाच्या पायावर उभा आहे. भ्रष्टाचार, अनाचाराच्या डबक्यात खुशाल लोळून आमच्या गटात येऊन मंगलमय व्हा. भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये घुसळून स्वच्छ करून देऊ. ईडी वगैरेचे भय बाळगायचे कारण नाही. ‘ईडी’च्या कितीही ‘केसेस’ असल्या तरी आमच्याकडे येताच शांत झोप लागेल याची हमी देऊ. गुणकारी औषधांचा लाभ कसा आहे याची खातरजमा हर्षवर्धन पाटलांसारख्या पूर्ण बऱ्या झालेल्या रोग्याकडून करून घ्या, असा एकंदरीत शिंदे-फडणवीस सरकारचा दावा आहे. त्यामुळे महाराष्ट्रास तब्बल चाळीस दिवसांनी एक सरकार लाभले आहे व त्या सरकारकडून महाराष्ट्राला फार काही मिळेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. मुळात या सरकारच्या चारित्र्य व प्रतिमेचाच घोटाळा आहे. किचकाने द्रौपदीचा विनयभंग केला, मांडीवर थाप मारून तो वारंवार पापाची भाषा बोलत होता. म्हणून भीमाने किचकाची मांडीच फोडली. फडणवीस यांच्या दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली आहेत व हे पाप महाराष्ट्राच्या माथी मारण्याचे कार्य मंत्रिमंडळ विस्ताराने पुढे नेले आहे, ही महाराष्ट्राची बदनामीच आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

औटघटकेची मंत्रिपदे त्यांनाच लखलाभ
“दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्र मागच्या रांगेत गेलाच आहे. विकासाच्या शर्यतीत तरी तो पुढे राहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. क्रांती दिनाचा मुहूर्त शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी निवडला गेला. आता काही लोक बेइमानी, विश्वासघातालाच ‘क्रांती’ म्हणत असतील तर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आपापल्या दालनात लखोबा लोखंडेच्या तसबिरीच लावाव्यात. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांची औटघटकेची मंत्रिपदे त्यांनाच लखलाभ ठरोत. मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.