मुंबई, दि. 16 (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून सुरु होती. अखेर सोमवारी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी त्याला दुजोरा दिला. आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. ते म्हणाले, मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय? काही फरक पडत नाही. मंत्रिपद किती वेळा आले आणि गेले. पण भुजबळ काही संपले नाही, असे वक्तव्य करत त्यांनी पक्षश्रेष्ठींना इशारा दिला.
मंत्रिपद मिळाले नाही, त्यानंतर पक्षातील नेत्यांशी किंवा अजित पवार यांच्याशी काही चर्चा झाली का? त्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, मी कालपासून काही चर्चा केली नाही. मी कुणाशी बोललो नाही. पुढे काय करायचे हे माझ्या लोकांशी, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी बोलून ठरवणार आहे. तुम्ही शरद पवार यांच्याकडे जाणार का? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, शरद पवार यांच्याकडे मी १२ डिसेंबरला जाऊन आलो ना.
मी ओबीसीची लढाई लढलो. त्यामुळे सर्व ओबीसी एकत्र आले आणि महायुतीला मोठे यश मिळाले आहे. अर्थात त्यात लाडकी बहीणचा वाटा आहे. परंतु ओबीसींचा सपोर्टही आहे. ओबीसींच्या लढाईमुळे यश मिळाले आहे, असे ज्यांना वाटते त्यांच्याबद्दल मी आभारी आहे, असे भुजबळ यांनी म्हटले.
मनोज जरांगे यांना अंगावर घेतले, त्याचे हे बक्षीस मिळाले, अशी संतप्त प्रतिक्रिया भुजबळ यांनी माध्यमांकडे बोलताना दिली. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांचा वाद राज्यभर गाजला. या वादात छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार यांची कोंडी झाली होती. छगन भुजबळ व मनोज जरांगे वादाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसल्याचे मत पक्षातील काही लोकांनी व्यक्त केले होते.