पुणे,दि. ४ – पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐन वेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. प्रसूती वेदना तीव्र होऊ लागल्याने महिलेला खासगी गाडीने 25 किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या रुग्णालयात दाखल करताच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आता या घटनेवरून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर संबंधित रुग्णालयावर चौकशी करून कारवाईचे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक येणारे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्य द्वारावर तपासूनच आत मध्ये सोडलं जात आहे. मुख्य द्वारावर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांकडून आज रुग्णालयात चौकशी करण्यात येणार आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा बाहेर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे. तसेच रुग्णालयातील भिसे कुटुंबियांच्या संपर्कात राहिलेल्या नर्स आणि डॉक्टरांचा जबाब घेतला जाणारं आहे. त्यांनतर अहवाल आरोग्य खात्याला दिला जाणार आहे. तर प्रसुती दरम्यान महिलेचा मृत्यू प्रकरणात आता संबंधित रुग्णालयावर चौकशी करून कारवाईचे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. गंभीर रुग्णांच्या बाबतीत रुग्णालयांनी घ्यावयाच्या काळजीबाबत नियमावली तयार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली उर्फ ईश्वरी ऊर्फ तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत होत्या. सुशांत यांनी पत्नीला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांच्याकडे 10 लाखांची मागणी करण्यात आली. त्यावर अडीच लाख रुपये आता तातडीने भरतो. उपचार सुरू करा, अशी विनंती सुशांत भिसे यांनी केली. पण, रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यात गर्भवतीची तब्बेत खालावली आणि जीव गेला. काही मंत्री, आमदार यांनीही रुग्णालय प्रशासनाला फोन केले. परंतु प्रशासन कोणाचं ऐकलं नाही. प्रसूती वेदना वाढल्याने नाईलाजानं सुशांत यांनी वाकड येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये तनिषा यांना नेण्याचा निर्णय घेतला. मात्र तातडीने अॅम्ब्युलन्सही उपलब्ध झाली नाही. शेवटी खासगी गाडीनेच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सिहोरीनद्वारे प्रसुती झाली. तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यास सांगितलं. त्यानुसार जवळच्या मणिपाल रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांनी आपला जीव गमावला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या नातेवाईकाला १० लाख डिपॉझिट भरण्यास सांगितल्याची रीसीट समोर आल्यानंतर अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.