मंगल केंद्रातील भांड्यांचा अपहार प्रकरणी आणखी दोन गुन्ह्यांची नोंद

0
291

चिखली, दि. ५ (पीसीबी)- मंगल केंद्रातील भांडी कार्यक्रमाच्या बहाण्याने नेऊन त्याचा अपहार केल्या प्रकरणी भोसरी, दिघी आणि देहूरोड पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 3) गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर सोमवारी महाळुंगे एमआयडीसी आणि चिखली पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या टोळीने शहराच्या सर्व भागांत मंगल केंद्रातील भांडी नेऊन त्याचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.

संतोष किसन गाडे (वय 48, रा. येलवाडी, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद सूर्यवंशी (रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडे यांच्या प्रवीण मंगल केंद्र या दुकानातून आरोपीने भांडी नेली. मुलाचा वाढदिवस असून त्यासाठी भांडी लागणार असल्याचे कारण त्याने सांगितले होते. 26 फेब्रुवारी रोजी विनोद सूर्यवंशी याने गाडे यांच्या दुकानातून 80 हजार रुपयांची भांडी 1250 रुपये भाडेतत्वावर नेली. त्यानंतर त्याने फोन बंद करून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

बापूसाहेब रामभाऊ भालके (वय 53, रा. चिखलीगाव) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद लक्ष्मण सूर्यवंशी (रा. शिरोली, ता. खेड) आणि एक वयस्कर व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भालके यांचे शुभमंगल जनसेवा केंद्र नावाचे दुकान आहे. 22 फेब्रुवारी रोजी आरोपींनी भालके यांच्या दुकानातून एक लाख 77 हजार 100 रुपये किमतीची केटरिंगची भांडी नेली. ती भांडी परत न करता भालके यांची फसवणूक केली. भालके यांना देखील आरोपींनी मुलाचा वाढदिवस असून त्यासाठी भांडी लागणार असल्याचे कारण सांगितले.