मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला शुक्रवारपासून प्रारंभ

0
402

पिंपरी दि.२६ (पीसीबी) – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरातून निघणाऱ्या द्वारयात्रेस येत्या शुक्रवार (दि.29) पासून प्रारंभ होणार आहे.

सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शु. प्रतिपदा ते चतुर्थी असे चार दिवस श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांची द्वारयात्रेची परंपरा आहे. या चार दिवसात चिंचवडगावच्या चारही दिशांच्या द्वाराला असलेल्या देवींच्या स्थानाला जाण्याची परंपरा आहे. द्वारयात्रेच्या काळात रोज सकाळी नऊ वाजता यात्रेसाठी श्री मंगलमूर्ती वाड्यातून चिंचवड देवस्थानचे ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त श्री देव महाराज यांच्या समवेत सुमारे 100 ते 150 भाविकांचा समुदाय वाजत-गाजत निघतो.

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन या यात्रेस प्रारंभ केला जातो. द्वाराच्या ठिकाणी पोहोचल्यावर द्वारदेवतेचे पूजन, श्रीमोरया गोसावींनी रचलेली पदे व गोंधळ, जोगवा म्हणणे इ. धार्मिक विधी केले जातात. व पुन्हा येऊन श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरातील श्रीचिंतामणी महाराज यांच्या समाधी समोर धुपारती होते, व मगच द्वरयात्रेची सांगता होते. यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे महाप्रसादाचे वाटप केले जाते.

द्वारयात्रा पहिल्या दिवशी 29 जुलै रोजी पूर्व द्वार असलेल्या एम्पायर इस्टेट सोसायटी, चिंचवड स्टेशन येथील श्री मांजराई देवी मंदिर येथे जाणार असून यात्रेच्या दुसऱ्या दिवशी 30 जुलै रोजी दक्षिणद्वार असलेल्या वाकड येथील श्री आसराई देवी मंदिर, तिसऱ्या दिवशी 31 जुलै रोजी पश्चिमद्वार असलेल्या रावेत येथील श्री ओझराई देवी मंदिर आणि चौथ्या दिवशी 1 ऑगस्ट रोजी उत्तरद्वार असलेल्या आकुर्डी येथील श्री मुक्ताई देवी मंदिरात व श्री खंडोबा मंदिरात यात्रा दर्शनासाठी जाणार आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांनी दिली.