भ्रष्ट व्यक्ती कितीही शक्तिशाली असली तरी तिच्याविरोधात न घाबरता कारवाई करा

0
169

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – देशात आता भ्रष्टाचाराविरोधात कारवाईसाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नाही, भ्रष्ट व्यक्ती कितीही शक्तिशाली असली तरी तिच्याविरोधात न घाबरता कारवाई करा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना दिला. यावेळी मोदी यांनी कुणाचे नाव न घेता काँग्रेससह विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून जोरदार टीकास्त्र सोडले.

सीबीआयच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले, की भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त करणे ही या संस्थेची मुख्य जबाबदारी आहे. कोणत्याही भ्रष्ट व्यक्तीला मोकळे सोडू नये अशी देशातील नागरिकांची इच्छा आहे. भ्रष्टाचार हा लोकशाही आणि न्याय यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. अनेक दशकांपासून भ्रष्टाचाराचा लाभ करून घेणाऱ्यांनी तपास यंत्रणांवर हल्ला करणारी यंत्रणा निर्माण केल्याचा आरोप मोदी यांनी विरोधकांवर केला. सीबीआयची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडे लक्ष न देता आपले काम करत राहा. देश, कायदा आणि राज्यघटना तुमच्याबरोबर आहे, असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दळणवळण आणि वस्तू आणि सेवांचे व्यवहार वाढत असल्यामुळे भारत आर्थिकदृष्टय़ा अधिक शक्तिशाली होत आहे. असे असताना या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. भारताची सामाजिक बांधणी, ऐक्य आणि बंधुभाव यावरील हल्ले आगामी काळात वाढतील आणि त्यासाठी भ्रष्टाचारातून जमा केलेल्या पैशांचाच उपयोग केला जाईल, असे भाकीत पंतप्रधानांनी केले.

सीबीआयने लोकांना विश्वास दिला
सीबीआयने आपले काम आणि शैलीमुळे नागरिकांना विश्वास दिला आहे. सीबीआयचे नाव प्रत्येकाच्या ओठांवर असते, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. या विश्वासामुळेच अगदी ग्रामपंचायत पातळीवरही काही मोठा गुन्हा घडला तर लोक सीबीआय तपासाची मागणी करतात, असेही ते म्हणाले.
घराणेशाही वाढते तेव्हा देशाची ताकद कमी होते. देश शक्तिहीन झाला की त्याचा विकासावर परिणाम होतो. स्वातंत्र्याच्या वेळी देशाला भ्रष्टाचारही वारशात मिळाला, पण तो दूर करण्याऐवजी काही लोकांनी त्याला खतपाणी घातले. त्यावेळी भ्रष्टाचाराचा विक्रम कोण रचतो याचीच जणू स्पर्धा सुरू होती.