भोसरी विधानसभेतून महाविकास आघाडीतर्फे अजित गव्हाणे आज अर्ज दाखल करणार

0
62

– परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी व्हा; अजित गव्हाणे यांचे आवाहन

भोसरी, दि. 28 (पीसीबी) : महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे सोमवारी ( दि 28 ) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी ते ग्रामदैवत भैरवनाथ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करतील यावेळी कार्यकर्त्यांचे मोठे शक्ती प्रदर्शन देखील होणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून भोसरी मतदारसंघांमध्ये परिवर्तनाची लढाई स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे तसेच आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, ग्रामस्थ यांनी सुरू केली आहे. भोसरी मतदारसंघात वाढलेली दादागिरी, दहशतवाद, भ्रष्टाचार यांना पायबंद घालण्यासाठी नैतिकतेची ही लढाई असल्याचे अजित गव्हाणे यांनी स्पष्ट केले आहे.

भोसरी मतदारसंघांमध्ये विकास कामांचा केवळ दिखावा करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षापासून अनेक रस्ते प्रलंबित आहे. या विधानसभा मतदारसंघाला रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अद्यापही मिळाली नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे. मनमानी कारभार, पदाधिकारी व नगरसेवक यांच्या कामात लुडबुड, प्रशासकीय कामात हस्तक्षेप या प्रकारांना सर्वच नाराज आहेत. ही नाराजी परिवर्तनामध्ये बदलणार आहे. या बदलासाठी नागरिक तयार असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतपेटीतून नागरिक आपली नाराजी व्यक्त करतील असा विश्वास अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.

परिवर्तनासाठी एकत्र या, बहुसंख्येने या!

भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अजित गव्हाणे सकाळी नऊ वाजता ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेणार आहेत. तत्पूर्वी लांडेवाडी ते पीएमटी चौक या दरम्यान कार्यकर्त्यांसोबत अजित गव्हाणे पदयात्रा करणार आहेत. त्यानंतर अर्ज भरण्यासाठी गव्हाणे रवाना होणार आहेत.