भोसरी येथील शिलाई केंद्रामध्ये महापालिकेच्या वतीने मोफत फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण सुरू– जास्तीत महिलांनी उपक्रमाचा लाभ घेण्याचे महापालिकेच्या वतीने आवाहन

0
7

पिंपरी, दि. २ ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने भोसरी येथील शिलाई केंद्रामध्ये महिलांसाठी १७ मार्चपासून मोफत फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. याद्वारे एका बॅचमध्ये सरासरी ३० ते ३५ महिला प्रशिक्षण घेत आहेत. तसेच नुकत्याच दहावी व बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनींसह विविध वयोगटातील महिलांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना हाय स्पीड मशीन, पिकोफॉल मशीन, ओव्हर लॉक मशीन, एम्ब्रोईडरी मशीन, स्टीम आयर्न, इलेक्ट्रिक कटिंग मशीन इत्यादी आधुनिक यंत्रसामग्री वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच डिझायनर ड्रेस, ब्लाऊज, स्कर्ट, फ्रॉक, वन पीस, घागरा, आरी वर्क, एम्ब्रोईडरी, फॅब्रिक पेंटिंग, बांधणी बाटिक वर्क अशा विविध कौशल्यांवर भर दिला जात आहे.

उत्पादनांच्या जाहिरात व विक्रीसाठी डिजीटल मार्केंटींगचे देखील देणार प्रशिक्षण
महिलांना स्वतः शिवलेल्या कपड्यांची जाहिरात व विक्री करता यावी यासाठी डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण (इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअँप) देखील दिले जात आहे. त्याचप्रमाणे, व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची उपलब्धता, विक्रीसाठी बाजारपेठ यासंदर्भात पाहणी दौऱ्यांचे आयोजन देखील करण्यात येत आहे.

प्रशिक्षणासाठी विशेष प्रशिक्षकांची नेमणूक
फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण महिलांना देण्यासाठी विशेष प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही कोरोना महामारीच्या काळात ‘उमेद जागर’ प्रकल्पातील महिलांना यशस्वीरित्या शिलाईचे प्रशिक्षण देण्यात आले होते. सध्या या प्रशिक्षकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त गरजू आणि इच्छुक महिलांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येत आहे.