भोसरी मध्ये तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

0
2

पोलिसांनी आपली मदत केली नसल्याचा आरोप

दि.०६(पीसीबी)-भोसरी येथे एका इमारतीवरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (५ फेब्रुवारी) सायंकाळी धावडे वस्ती येथे घडली. दरम्यान, तरुणाकडे चिठ्ठी सापडली असून त्यात पोलिसांवर धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. पत्नी बेपत्ता असून तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा त्याचा संशय होता. याबाबत त्याला पोलिसांनी मदत केली नसल्याचा आरोप चिठ्ठीत करण्यात आला आहे.

केशरी प्रसाद साहू (भोसरी, पुणे. मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी साहू हा धावडे वस्ती भोसरी येथील एका इमारतीवर चढला. तो इमारतीवरून उडी मारण्याच्या तयारीत होता. स्थानिकांनी हा प्रकार पाहिला आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या पत्नीसोबत बोलण्याची मागणी केली. त्यानुसार त्याचे त्याच्या पत्नीसोबत बोलणे करून देण्यात आले. त्यानंतर त्याने अचानक इमारतीवरून खाली उडी मारली.

साहू याच्याकडे चार पानांची चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये त्याने पोलिसांवर देखील आरोप केले आहेत. साहू याची पत्नी बेपत्ता असून तिला फूस लावून पळवून नेल्याचा त्याचा संशय आहे. संशयित व्यक्तींकडे चौकशी करावी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावेत आणि पत्नीला शोधून आणावे, अशी तक्रार त्याने पोलिसांकडे केली. मात्र त्याला पोलिसांची पुरेशी मदत मिळाली नसल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. माझी बायको कुठेही राहू शकत नाही. तिला माझ्याकडे परत आणा. ती परत येईल. बायको माझ्यासोबत नाही राहिली तर मुलीसाठी मी जगेन. माझ्या मृत्यूनंतर मला दफन करा. अग्निसंस्कार केले तर मुलीच्या हस्ते करा. पत्नी जिथे आहे तिथे जास्त दिवस राहणार नाही. तीला गावी सोडा, असेही चिठ्ठीत म्हटले आहे.