पुणे, दि. २१ : पुणे रेल्वे स्टेशन आणि भोसरी परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देणारा फोन महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला करण्यात आला आहे. धमकीच्या या फोनने खळबळ उडाली असून पुणे पोलिसांकडून रेल्वे स्टेशन परिसरासह विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू करण्यात आली. पुण्यातील बंड गार्डन पोलीस आणि सीआरपीएफ रेल्वे पोलीस यांनी शोध मोहीम राबवली असता रेल्वे स्थानक परिसरात कसल्याही संशयास्पद वस्तू आढळून आलेल्या नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या ११२ या क्रमांकावर आज सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. “पुणे रेल्वे स्थानक, येरवडा आणि भोसरी या परिसरात बॉम्बस्फोट घडवण्यात येणार आहे,” अशी धमकी या फोनवरून देण्यात आली. त्यानंतर याबाबत बंड गार्डनर पोलीस स्थानकाला माहिती कळवण्यात आली. पोलिसांकडून विविध ठिकाणी शोध घेण्यात आला असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.
दरम्यान, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.