भोसरी जमीन घोटाळा प्रकऱणात खडसे यांच्या पत्नीला न्यायालयाचा दिलासा कायम

0
386

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलेला दिलासा पुन्हा एकदा 16 सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीला मंदाकिनी खडसे चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहेत. वेळोवेळी त्यांनी चौकशीसाठी हजेरी लावलेली आहे, अशी माहिती त्यांचे वकील मोहन टेकवडे यांनी कोर्टाला दिली, याची नोंद घेत हायकोर्टानं मंदाकिनी खडसेंनी दिलेला अंततरिम दिलासा कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यापुढे सोमवारी मंदाकिनी खडसे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली.

खडसे कुुटुंबियांविरोधात ईडीकडनं याप्रकरणी आरोपपत्र केलेलं आहे. या एक हजार पानी आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रिंगचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी अटकेत असलेले खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनी याप्रकरणी आपल्याला बळीचा बकरा बनवलं गेलंय असा आरोप केला होता. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं चौधरींचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. साल 2016 मध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना हा सारा व्यवहार झाला होता. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशीही झाली होती, मात्र एसीबीनं खडसेंना क्लीन चीट दिलेली आहे.

काय आहे प्रकरण –
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. 52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडनं आलेला पैसा वापरल्याचं कागदोपत्री निष्पन्न झालेलं आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचं सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.