पिंपरी , दि. ८ (पीसीबी) – भोसरी-चक्रपाणी वसाहत येथील गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले असून, सुमारे १ लाख रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. दिघी-आळंदी मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या या रस्त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आमदार महेश लांडगे यांनी ३४५ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद असलेल्या रस्त्यावर नियमितपणे सुमारे ५० हजार नागरिक- वाहनचालकांची रहदारी असते. त्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांना केली होती.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांच्या ‘आमदार विशेष निधी’ योजनेतून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. दिघी-आळंदी मुख्य रस्त्याला हा चक्रपाणी वसाहतीमधील समांतर रस्ता आहे. या रस्त्यामुळे दिघी-आळंदी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार असून, स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच, भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन ड्रेनेज व्यवस्थेचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून परिसरातील प्रलंबित समस्या मार्गी लागत आहेत. कोणतेही काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला जातो, अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून येत आहेत.
प्रभाग क्रमांक ६ चक्रपाणी वसाहत म्हणजे रेड झोन आणि प्राधिकरणाच्या हद्दीलगत असलेला प्रभाग आहे. त्यामुळे पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी अनेक अडचणी येतात. गेल्या ३० वर्षांपासून हिच परिस्थिती होती. मात्र, २०१४ पासून आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून परिसरातील पायाभूत सोयी-सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे.