पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – अयोध्या येथील राम जन्मभुमी मंदिरातील रामलल्लांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त २२ जानेवारीला देशभरात मंदिरांची सफाई मोहीम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतो आहे. भोसरी इंद्रायणीनगर सेक्टर ७ मधील राम मंदिरातही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. जिजाई प्रतिष्ठानच्या तसेच पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमाताई सावळे यांच्या नेतृत्वाखाली राम भक्तांनी हातात खराटे, झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली.
सोमवारी भजन, किर्तन, सुंदरकांड आणि महाप्रसाद –
अयोध्या येथे सोमवारी दुपारी भव्यदिव्य अशा राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याच दिवशी इंद्रायणीनगर येथील श्रीराम मंदिरातही दिवसभरासाठी विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अगदी पहाटे पाचपासून अभिषेक, आरती, यज्ञ, भजन-किर्तन, प्राणप्रतिष्ठा, सुंदरकांड आणि महाप्रसाद असा दिवसभराचा कार्यक्रम होणार असून परिसरातील तमाम रामभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महपालाका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमाताई सावळे आणि बांधकाम व असंघटित कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष सारंग कामतेकर यांनी केले आहे.