भोसरीमध्ये मराठा समाजाच्या वतीने एकदिवसीय उपोषण

0
378

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले असून राज्यभरातील मराठा बांधव आता चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. गावागावांमध्ये नेत्यांना येण्यास बंदी घालण्यात येते असून दुसरीकडे विविध ठिकाणी जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. भोसरीमध्ये सखल मराठा समाजाच्या वतीने आज एकदिवसीय उपोषण करण्यात येत आहे.

भोसरीमध्ये करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणास माजी आमदार विलास लांडे यांनी हजेरी लावली. यावेळी मराठा समाजातील तरुणांच्या भविष्यासाठी आरक्षण मिळायलाच हवे, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला आपला पाठींबा असून समाजासाठी लढण्यासाठी आपण सोबत असल्याची भावना यावेळी लांडे यांनी व्यक्त केली.

जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र हादरून सोडल्याने त्यांच्या आंदोलनासमोर सरकारला देखील गुडघे टेकवावेच लागतील. त्यानंतर आरक्षणही मिळेल. पण जरांगे पाटील यांनी मागील चार दिवसांपासून अन्न पाणी वर्ज्य केल्याने माझ्यासारखा कार्यकर्ता अस्वस्थ असून त्यांनी तब्बेतीची काळजी घेऊन महाराष्ट्रातील मराठा तरुणांना दिशा द्यावी. महाराष्ट्रातील मराठा बांधवांना विश्वासार्ह चेहरा कित्येक वर्षांनी सापडला आहे. अशा नेतृत्वाला आम्हाला गमवायचे नाही, असेही लांडे यावेळी म्हणाले.

भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार राहिलेले विलास लांडे यांचा २०१९ साली पराभव झाल्यानंतर ते काहीसे शांत झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट आपले स्थान बळकट करण्यासाठी सक्रिय झाला होता. परंतु लांडे यांच्या मागे असणारा जनाधार कायम राहिल्याने या नेत्यांना फार काही साध्य करता आले नाही. आता पक्षात झालेल्या उलथापालथीनंतर एका बाजूला जेष्ठ नेते शरद पवार यांचा गट तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट शहरात निर्माण झाले आहेत. यामध्ये लांडे यांनी दोन्ही नेत्यांना न दुखावण्याचा भूमिका घेतल्याचे दिसत आहेत. लांडे यांच्याकडून शिरूर लोकसभेतून लढण्यासाठी देखील चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे लांडे सक्रिय झाल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत विरोधकांसह विरोधकांची चलबिचल वाढली आहे.