भरधाव वेगात असलेल्या बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (२४ जानेवारी) रात्री १० वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे हायवे रोडवरील रोशन गार्डनसमोर, भोसरी येथे घडली.
भीमराया पाटील असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत बसवराज आळगी (२५, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बस चालक कुलदीप माणिक थोरात (३२, दिघी आळंदी रोड, भोसरी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मित्र भीमराया पाटील हा इलेक्ट्रिक दुचाकीवरून घरी जात असताना बसने त्याच्या गाडीला उजव्या बाजूने जोराची धडक दिली. या अपघातात भीमराया बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर चालक मदतीसाठी न थांबता बस घेऊन पळून गेला, मात्र नागरिकांनी त्याला काही अंतरावर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. उपचारापूर्वीच भीमरायाचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.





































